Nana Patekar Makrand Deshpande: अभिनेते नाना पाटेकरांना राग येतो हे सर्वश्रूत आहे. शूटिंग करताना ते दिग्दर्शक व सहकलाकारांवर चिडतात. आपल्याला राग येतो, याची कबुली खुद्द नाना यांनीही दिली आहे. मराठमोळे अभिनेते मकरंद देशपांडे यांनी नाना पाटेकर दिग्दर्शित ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटात काम केलं होतं. या सिनेमात मकरंद यांची भूमिका खूप छोटी होती. तसेच सिनेमाचं शूटिंग पूर्ण केल्यावर आपण नानांबरोबर जेवायला जाण्यास नकार दिला होता, असं मकरंद म्हणाले होते.

कुनिका सदानंदशी बोलताना मकरंद म्हणाले की सुरुवातीला त्यांना या चित्रपटात एका कमांडोच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं होतं. पण नंतर मात्र त्यांना माधुरी दीक्षितचा भाऊ म्हणून पुन्हा सिनेमात घेतलं, कारण ते कावीळमधून नुकतेच बरे झाले होते. “नानांनी सांगितलं की मी कमांडो ट्रेनिंग घेऊ शकत नाही कारण मी कदाचित मरेन. म्हणून त्यांनी मला माधुरीच्या भावाची भूमिका करायला सांगितलं. ती भूमिका ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीची होती. सिनेमात माझे फक्त दोन सीन होते, मी ते वाचले आणि वाह, काय सीन आहे, अशी माझी प्रतिक्रिया होती,” असं मकरंद म्हणाले.

नानांची जीप एका बिल्डिंगखाली उभी होती

मकरंद देशपांडेंनी या सिनेमातील एक प्रसंग आठवत सांगितलं की शूटिंगच्या धावपळीत त्यांना रिहर्सल करण्यासाठी किंवा सीनवर चर्चा करण्यासाठी नाना पाटेकरांना भेटता आलं नाही. “मला खूप राग येत होता. एक उत्साही थिएटर कलाकार म्हणून मला खूप तयारी करावी लागली. पण नाना तसं काहीच करत नव्हते. मला आठवतं की नानांची जीप एका बिल्डिंगबाहेर उभी होती, मी त्यांना शोधत आत शिरलो. मला नंतर समजलं की ते घर प्रहारचे सिनेमॅटोग्राफर देबू देवधर यांचे आहे,” असं मकरंद देशपांडे म्हणाले.

नाना फक्त हसले अन्…

मकरंद का आले आहेत हे समजल्यावर नाना पाटेकर हसले होते. “नाना फक्त हसले आणि म्हणाले की त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच मला सिनेमात घेतलंय. पण मला वाटत होतं की ते पूर्णपणे चुकतायत,” असं मत मकरंद देशपांडे यांनी व्यक्त केलं होतं.

नाना मकरंद यांना म्हणाले असं काही की…

सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि पहिला शॉट पूर्ण होईपर्यंत नाना चुकत आहेत, यावर मकरंद ठाम होते. “मी १५ मिनिटं वाट पाहिली. मी माझ्या भूमिकेची तयारी आधीच केली होती. मी माझे केस सरळ केले होते, मी ड्रग्ज व्यसनी दिसण्यासाठी स्वतःच माझा शर्ट तसा तयार केला. मी तिथे गेलो, पण नाना तिथे नव्हतेच. अखेर जेव्हा ते आले तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तयार होतो आणि या सीनमध्ये काय करायचंय ते सांगतो” असं मकरंद म्हणाले. यावर नाना हसत “मी अजूनही दिग्दर्शक आहे, बरोबर ना?” असं म्हणाले होते.

मकरंद देशपांडे यांनी ‘प्रहार’च्या शूटिंगदरम्यानचा आणखी एक किस्सा सांगितला. या चित्रपटातील एका विशिष्ट दृश्यात माधुरी दीक्षितला सुधारणा करायची होती, पण नाना पाटेकरांनी त्यासाठी नकार दिला. “नानांनी माधुरीकडे पाहिलं आणि तिला काहीही सुधारणा करू नकोस नाहीतर मी तुझ्यावर ओरडणार असं म्हटलं,” असं मकरंद म्हणाले.

“आम्ही दुपारच्या जेवणाआधी सगळे सीन पूर्ण केले आणि पॅक-अप झाल्यावर नानांना एकत्र जेवायला जायचं होतं. पण मी त्यांच्याबरोबर जेवायला करण्यास नकार दिला आणि सांगितलं की त्यांनी मला वेळ दिला नाही, त्यामुळे मी माझा वेळ देणार नाही,” असं मकरंद देशपांडे यांनी सांगितलं.