जाहिरात दिग्दर्शक प्रल्हाद कक्कर यांनी बऱ्याच कलाकारांबरोबर काम केलं आहे. आता एका मुलाखतीत त्यांनी काही कलाकारांचे किस्से, त्यांच्याबद्दलची मतं व्यक्त केली. त्यांनी अभिनेत्री पूजा बेदी आणि तिची दिवंगत आई प्रोतिमा बेदी यांना ‘क्रेझी’ म्हटलं. प्रोतिमामध्ये मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर नग्नावस्थेत धावण्याचे धाडस होते, जे आपण कधीही करू शकलो नसतो, असं त्यांनी नमूद केलं.

विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत प्रल्हाद यांनी खुलासा केला की प्रोतिमा पूजाला त्यांच्या जबाबदारीवर सोडून जायच्या. नंतर पूजाने प्रल्हाद यांच्यासाठी मॉडेलिंग सुरू केले. पूजाबद्दलचा एक किस्सा त्यांनी सांगितला. पूजा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास नकार द्यायची, ती मुंबईत लिफ्ट मागून फिरायची. एके दिवशी, ती अनेक डुप्लिकेट स्वॉच घड्याळं घेऊन ऑफिसमध्ये आली होती आणि तिने ती तिच्या सहकाऱ्यांना दिली होती.

पूजा बेदीच्या घड्याळाचा किस्सा

प्रल्हाद यांनी पूजाला विचारलं की तिला ही घड्याळे कुठून मिळाली? तिने सांगितलं की ज्या माणसाने तिला त्या दिवशी लिफ्ट दिली होती तो घड्याळ विक्रेता होता. त्याने त्याची ब्रीफकेस उघडली आणि तिला सर्व घड्याळे दाखवली आणि तिला एक हवी आहे का? असं विचारलं. तिने स्वतःसाठी एक घेतली, पण त्या माणसाने म्हटलं की इतरांनाही हवी असेल तर घे. म्हणून तिने खूप सारी घड्याळे घेतली. प्रल्हाद पूजाच्या या कृतीने प्रभावित झाले, पण त्यांना तिच्या सुरक्षेची काळजी वाटत होती. “मी तिला म्हणालो, ‘तू निर्लज्ज आहेस का? त्याने तुझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला असता असं तुला वाटत नाही का?”

प्रल्हाद पुढे म्हणाले, “ती वेगळीच होती. मी आतापर्यंत ज्या लोकांना भेटलोय, त्यापैकी सर्वात वेडी, स्वतःवर नियंत्रण नसलेली तरुणी होती. ती कमाल होती. जगात असं काहीही नव्हते जे ती करू शकत नाही, असं तिला वाटायचं. आमचं संपूर्ण ऑफिस तिच्याकडे आकर्षित झालं होतं, कारण ती खूपच सुंदर होती.”

प्रोतिमा बेदी यांचे निधन

दरम्यान, पूजा बेदीची आई प्रोतिमा बेदी यांचे कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान दरड कोसळून निधन झाले. त्यांच्या मृत्यूबद्दल पूजा एकदा इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणालेली, “वयाची पन्नाशी पूर्ण करण्यापूर्वीच तिचं निधन झालं, या गोष्टीचं मला खूप दुःख आहे. मी तिच्यासाठी काहीतरी करू शकले असते तर, असं मला नेहमी वाटतं. पण ती स्वतःच्या अटींवर आयुष्य जगली. ती तिचं आयुष्य तिच्या मनाप्रमाणे जगली आणि खरोखर तिच्या हवं होतं तसं मरणं तिला आलं. ती नेहमीच म्हणायची की तिला नैसर्गिक मृत्यू हवा आहे आणि निसर्गात विलीन व्हायचं आहे.”