भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ज्यांचाकडे पाहिलं जातं, त्या म्हणजे दिवंगत स्मिता पाटील. खरं तर खूर कमी काळ त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं; पण त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका चित्रपटांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नक्कीच कोरली गेली. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा स्मिता पाटील चर्चेचा विषय ठरल्या असून निमित्त आहे ते म्हणजे त्यांचा मुलगा प्रतीक स्मिता पाटील.
प्रतीकने याआधी अनेकदा आपल्या आईच्या काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. प्रतीक हा स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा आहे; बाळंतपणानंतर लगेचच त्याच्या आईचे निधन झाल्यामुळे त्याला कठीण कौटुंबिक जीवनाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे नुकत्याच एका मुलाखतीत प्रतीक स्मिता पाटीलने सांगितलं की, तो त्याच्या या आयुष्याच्या शेवटी आई आणि आजी-आजोबांना भेटू इच्छितो.
वरिंदर चावलाला दिलेल्या मुलाखतीत प्रतीक म्हणाला, “मी हे जीवन आणि जीवनाची ही लढाई स्वत:च निवडली. मी एक अशी आई निवडली जी अचानक निघून जाईल; कारण मला माझ्या आयुष्यात कष्ट हवे होते. आणि मला कष्ट हवे होते कारण, मी आयुष्यात अनेक वेळा चुका केल्या. हे ते जीवन असू शकते, जिथे मी माझ्या आईला निवडले होते आणि इथे येण्यापूर्वी आम्ही एक करार केला होता.”
यापुढे प्रतीक म्हणाला, “आम्ही करार असा केला होता की, आपण हे जीवन एकत्र जगू. पण तू मध्येच निघून जाशील. मी त्रास सहन करणार. मी फक्त त्रासांमधून जाणार. कारण मला पुन्हा इथे यायचे नाही. आम्हाला हे पुन्हा करायचे नाही. म्हणून मला असे वाटतं की, या जन्मात मी माझे सर्व कर्म साफ करत आहे. पुढे प्रतीकने आईशी असलेल्या त्याच्या आध्यात्मिक संबंधाबद्दल सांगितले की, त्याला मरणोत्तर जीवनात तिच्याशी पुन्हा एकदा एकरूप व्हायचे आहे.
याबद्दल प्रतीकने सांगितलं, “मी हे निवडण्याचे कारण म्हणजे मला इथे परत यायचे नाही. मला आता हे सगळं संपवायचं आहे. त्यामुळे मी देवाला असं म्हणतो की, या जन्मात येणारे सर्व अडथळे मला दे; कारण मला पुनर्जन्म नको आहे. मला माझ्या पुढच्या जन्मात फक्त माझ्या आई आणि आजी-आजोबांबरोबर पार्टी करायची आहे. मला माहित आहे की, माझी आई आणि आजी-आजोबा माझी वाट पाहत आहेत.”