चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेत्रींना मिळणाऱ्या वागणुकीबद्दल बऱ्याच गोष्टी आपल्या कानावर आल्या आहेत. ‘कास्टिंग काउच’सारख्या प्रकाराला कित्येक अभिनेते तसेच अभिनेत्रीसुद्धा बळी पडल्या आहेत. आता पुन्हा स्त्रियांना मिळणाऱ्या या वागणुकीवर चर्चा होत आहे, निमित्त ठरला आहे तो एक व्हायरल होणारा व्हिडिओ. ही घटना बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची बहीण अभिनेत्री मन्नारा चोप्राबरोबर घडली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मन्नारा ही तेलुगू चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘तिरागाबादरा सामी’ हा तेलुगू चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझर लॉंचदरम्यानचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक ए.एस. रवीकुमार चौधरी हे मन्नाराला जबरदस्ती कीस करताना दिसले आहेत. मन्नाराच्या परवानगी शिवाय त्या दिग्दर्शकाने अशा पद्धतीने तिला कीस केल्याने सोशल मीडियावर सगळ्यांनीच संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : चित्रपटप्रेमी व शाहरुखच्या चाहत्यांखातर ‘जवान’चा पहिला शो ‘इतके’ वाजता; बॉक्स ऑफिसवर फक्त किंग खानचा बोलबाला

सोशल मीडियावर व्हायरल होणारा तो व्हिडीओ आणि या एकूण प्रकरणावर आता मन्नाराने भाष्य केलं आहे. एयरपोर्टवर मीडियाशी संवाद साधताना मन्नारा म्हणाली, “मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. जी बातमी व्हायरल झाली आहे किंवा जो व्हिडीओ सध्या चर्चेत आहे त्याचा दिग्दर्शकाशी थेट संबंध लावू नका. मला वाटतं की त्यांना माझं चित्रपटातील काम फारच आवडलं त्यामुळेच कदाचित ते खूप उत्सुक झाले होते, ती गोष्ट माझ्यासाठी पण एक सरप्राइजच होतं.”

पुढे ती म्हणाली, “माझे निर्माते आणि दिग्दर्शक यांना माझं काम प्रचंड आवडलं आहे. चित्रपटही उत्तम झाला आहे, मी यासाठी खूप उत्सुक आहे. कधी कधी उत्साहाच्या भरात येऊन माणसाकडून अशी गोष्ट होते. मी गेली कित्येक वर्षं दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत काम करत आहे. इथे मला अगदी योग्य आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळते. त्यामुळे त्या व्हायरल व्हिडीओमागे कसलंही तथ्य नाही, असं मुद्दाम करायचं असा हेतु आमच्या दिग्दर्शकाचाही नव्हता.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्नाराने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘जिद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर मात्र मन्नाराच्या बॉलिवूड करिअरला ब्रेक लागला तो कायमचाच. त्यानंतर तिने तिचा मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटांकडे वळवला. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकही फारसा प्रतिसाद देत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. तिच्या या आगामी चित्रपटात राज तरुण नायक आहे तर मकरंद देशपांडे हे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.