Punjab Womens Commission summons singers: गायक हनी सिंग अनेकदा त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटातील त्याने गाणी गायली आहेत. त्याचे त्याच्या गाण्यांसाठी कौतुक होताना दिसते. त्याच्या गाण्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

आता मात्र त्याच्या गाण्यातील काही शब्दांमुळे तो अडचणीत आला आहे. हनी सिंग आणि पंजाबी गायक करण औजला यांच्या गाण्यातील काही शब्द महिलांचा अपमान करणारे असल्याचे म्हटले जात आहे.

हनी सिंग आणि गायक करण औजला यांच्याविरोधात तक्रार

पंजाब महिला आयोगाने हनी सिंगच्या ‘मिलेनियम’ गाण्याबाबत पंजाब पोलिसांच्या डीजीपींना पत्रही लिहिले आहे. या पत्रात हनी सिंगविरुद्ध चौकशी करावी असे निवेदन दिले आहे. तसेच, हनी सिंगला ११ ऑगस्ट रोजी हजर राहण्यास सांगितले आहे.

दुसरीकडे, पंजाबी गायक करण औजलाच्या ‘एमएफ गब्रू’ या गाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. गाण्यात महिलांसाठी अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे पंजाब महिला आयोगानेही स्वतःहून दखल घेतली आहे. आयोगाने करण औजलाला ११ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

आता पंजाब महिला आरोगाच्या अध्यक्ष राज लाली सिंग यांचा एक व्हिडीओ सोशल एक्सवर शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात की मी गायक हनी सिंग आणि करण औजला यांच्याविरुद्ध महिलांसाठी अपशब्द वापरल्याबद्दल स्वतःहून तक्रार दाखल केली आहे. हे गायक महिलांसाठी अपशब्द वापरतात तो आपल्या संस्कृतीचा अपमान आहे.”

त्या असेही म्हणाल्या, “ही गाणी सर्वांनी ऐकली आहेत. अनेकांना त्यावर आक्षेपही आहे. मात्र, तरीही अशा गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळतात. ही जबाबदारी फक्त महिला आयोगाची नाही. श्रोते आणि समाजानेही अशा भाषेला नकार दिला पाहिजे. गायक त्यांच्या भाषेवर नियंत्रण ठेवत नाही किंवा महिलांचा आदर ठेवत नाहीत. ते पैसे कमविण्यासाठी असे करतात.”

हनी सिंगच्या गाण्यावरून वाद होण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. २०१९ मध्येही हनी सिंग त्याच्या गाण्यामुळे अडचणीत आला होता. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी हनी सिंगविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली होती.

मखना गाण्यात हनी सिंगने महिलांसाठी अपशब्द वापरल्याने मनीषा गुलाटी यांनी स्वतःहून दखल घेतली. पंजाब महिला आयोगाने पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रात, ‘मखना’ या गाण्याच्या ‘मैं हूं महिलानायक’ या शब्दांसाठी हनी सिंगविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची मागणी केली होती.