R Madhavan Receats To Working With Younger Heroines : अभिनेता आर. माधवन अलीकडेच त्याच्या ‘आप जैसा कोई’ या चित्रपटामुळे चर्चेत आला होता. त्यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री फातिमा सना शेख झळकली होती. दोघांच्या या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशातच आता अभिनेत्याने करिअरसंबंधित निर्णय, रिलेशनशिपमधील समानता, वाढतं वय याबद्दलचं त्याचं मत मांडलं आहे.

अभिनेता म्हणाला, “तुमचं वय वाढतंय हे तुम्हाला कळतं जेव्हा तुमच्या घरातील मुलं, मित्र तुम्हाला काका म्हणायला लागतात. तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटतं; पण त्याचा स्वीकार करावा लागतो. याबाबत त्यानं ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे. त्यामध्ये त्याने तरुण अभिनेत्रींसह काम करण्याबद्दलचा त्याचा अनुभवही सांगितला आहे.

आर. माधवनने सांगितला अभिनेत्रींसह काम करण्यचा अनुभव

आर. माधवन म्हणाला, “जेव्हा तुम्ही चित्रपट करत असता तेव्हा तुम्हाला अभिनेत्रींसह काम करण्याबद्दल काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. जरी त्यांना तुमच्याबरोबर काम करण्याची इच्छा असली तरी असं वाटू शकतं की, तो अभिनेता मजा करीत आहे. लोकांना वाटतं की, हा चित्रपटाच्या निमित्ताने ऐश करतोय. जर एखाद्या चित्रपटातून तशी भावना त्यांच्यासमोर येत असेल, तर त्या व्यक्तिरेखेप्रति त्यांचा आदर कमी होतो.”

अभिनेता पुढे म्हणाला, “मला असंही जाणवलं की, आता माझ्या शरीररात तेवढी ताकद राहिलेली नाही मी २२ वर्षांच्या मुलाप्रमाणे कामं करू शकत नाही आणि त्यामुळे मला माझ्या वयाप्रमाणेच काम करावं लागेल.” याच मुलाखतीत त्याने नात्यमधील समानतेबद्दलही सांगितले आहे. अभिनेता याबाबत म्हणाला, “माझ्या आई-वडिलांमध्येही खूप प्रेम होतं आणि त्यांच्या नात्यातही समानता होती. मला असं वाटतं की, तसंच नातं माझं माझ्या बायकोबरोबरही आहे. पण समानतेबद्दल माझ्या वडिलांचं मत आणि माझं मत यामध्ये अंतर आहे.”

आर. माधवन याबाबत पुढे म्हणाला, “कधी कधी एखाद्या महिलेसाठी दरवाजा उघडणं किंवा तो धरून ठेवणं काही लोकांना आक्षेपार्ह वाटू शकतं; पण तो पुरुष मुद्दाम अपमान करीत नसतो, ते त्याच्यावरचे संस्कार असतात. पितृसत्ताक समाजात एखाद्या पुरुषानं आपल्या पत्नीला काम करण्याची परवानगी देणं हे उदारपणाचं लक्षण मानलं जातं. पण, माझी पत्नी काम करते याचा मला अभिमान आहे, असं म्हणणं ही अधिक योग्य आणि आदराची पद्धत आहे.”