अभिनेते राहुल देव यांनी आजवर अनेक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. मराठी, हिंदी, तसेच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु, त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिकांसाठी ते ओळखले जातात. अशातच नुकतंच राहुल देव यांच्या सख्या भावाचं म्हणजे अभिनेते मुकुल देव यांचं दुःखद निधन झालं. त्यामुळे सध्या देव कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अशातच काही दिवसांपूर्वी राहुल देव यांनी एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितलं होतं. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबद्दल सांगितलेलं. राहुल देव यांनी ‘एफ.एम कॅनडा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, कर्करोगामुळे त्यांची पत्नी रीनाचं २००९ साली निधन झालं. त्यांनी रीना यांच्यासह १९९८ साली लग्न केलं होतं. दोघांनी ११ वर्षं सुखाचा संसार केला आणि जवळपास १८ वर्षे ते एकमेकांना ओळखत होते. परंतु रीना यांना कर्करोगाचं निदान झालं आणि कर्करोगामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला.
‘एफ.एम कॅनडा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांना त्यांच्या मुलाचा एकट्यानं सांभाळ करावा लागला याबाबत सांगितलं आहे. ते म्हणाले, “मुलाच्या शाळेत शिक्षक व पालकांची मीटिंग असायची तेव्हा इतर मुलांबरोबर बहुतांश वेळा त्यांच्या आई उपस्थित असायच्या. फार कमी वेळेला मुलांबरोबर मला त्यांचे वडील उपस्थित असलेले दिसायचे. तेव्हा मला जाणवलं की, पालकत्व सोपं नाही आणि आईची मुलांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका असते. पण, पत्नीच्या निधनानंतर मला आई व बाबा या दोन्ही भूमिका एकट्यानंच पार पाडाव्या लागत असल्यानं बऱ्याचदा मी माझ्या मुलाची आई होण्याचा प्रयत्न केला.”
दरम्यान, पत्नी रीना यांच्या निधनानंतर राहुल यांनी त्यांचा मुलगा सिद्धार्थ देवचा एकट्याने सांभाळा केला. पुढे काही वर्षांनी राहुल देव अभिनेत्री मुग्धा गोडसेसह रिलेशनशिपमध्ये आले. राहुल व मुग्धा हे दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये असून राहुल यांनीच याबाबत खुलासा केला होता.परंतु, अद्याप या दोघांनी एकमेकांसह लग्न केलेलं नाही. राहुल यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच ते ‘नाम’, ‘शिवरायांचा छावा’, ‘गॅसलाइट’ यांसराख्या चित्रपटांमध्ये झळकले होते.