रेखा व अमिताभ बच्चन यांचं एकेकाळी अफेअर होतं. दोघांच्या जवळीकतेची प्रचंड चर्चा झाली होती. रेखा अमिताभ यांच्यावरील प्रेम जाहीरपणे व्यक्त करायच्या, पण अमिताभ मात्र बोलणं टाळायचे. रेखा यांचं नाव बिग बीं व्यतिरिक्त काही अभिनेत्यांशी जोडलं गेलं होतं. त्यापैकी एक म्हणजे राज बब्बर होय.
बॉलीवूड शादीने दिलेल्या वृत्तानुसार, राज बब्बर व रेखा एकमेकांच्या खूप जवळ आले होते. राज बब्बर आणि रेखा हे दोघेही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात जवळच्या व्यक्तींना गमावल्यामुळे दुःखी होते तेव्हाच एकमेकांना भेटले होते. रेखा यांचं एक नातं तुटलं होतं, तर राज त्यांची दुसरी पत्नी स्मिता पाटीलच्या निधनाने दुःखी होते.
राज बब्बर व रेखा यांची भेट
राज बब्बर यांच्या आयुष्यात बरेच चढ-उतार आले. पहिली पत्नी नादिरा व त्यांच्यापासून दोन अपत्ये असतानाही घटस्फोट न घेता राज यांनी स्मिता पाटीलशी दुसरं लग्न केलं. पण मुलाच्या जन्मादरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे प्रसूतीनंतर काही दिवसांतच स्मिताचं निधन झालं. स्मिताच्या जाण्याने राज एकटे पडले आणि या काळात त्यांना एक आधार मिळाला.
रेखा त्यावेळी त्यांच्या आयुष्यात एका अतिशय वाईट टप्प्यातून जात होत्या. त्यांचंही नातं तुटलं होतं. त्याच काळात रेखा राज बब्बरना ‘अगर तुम ना होते’ च्या सेटवर भेटल्या. दोघांनी एकमेकांना भावनिक आधार दिला. मैत्रीपासून सुरू झालेलं हे नातं पुढे आणखी घट्ट झालं.

राज यांनी स्मिताच्या निधनानंतर काही काळाने पहिल्या पत्नीजवळ परतायचं ठरवलं. त्यांच्या या निर्णयामुळे रेखाला धक्का बसला होता, असं म्हटलं जातं. बॉलीवूड शादीने दिलेल्या वृत्तानुसार, राजबरोबरच्या नात्याचा शेवट झाल्यामुळे धक्का बसलेल्या रेखा मुंबईच्या रस्त्यांवर अनवाणी धावल्या होत्या, त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात राजविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. पण पोलिसांनी यास नकार देत घरी परत जायला सांगितलं होतं, असं म्हटलं जातं.
रेखा यांच्याबद्दल काय म्हणाले होते राज बब्बर?
एका जुन्या मुलाखतीत राज बब्बर यांनी रेखाबरोबरचं त्यांचं नातं स्वीकारलं होतं. आयुष्यातील कठीण काळात रेखाबरोबर भावनिक कनेक्शन झाल्याचं त्यांनी मान्य केलं होतं. “हो, आमच्या नात्यामुळे मला एका प्रकारे मदत झाली. काही विशिष्ट परिस्थितींमुळे आम्ही एकमेकांपासून दूर झालो होतो. त्यावेळी रेखाचं एक दीर्घकाळ असलेलं नातं तुटलं होतं. तिलाही त्या नात्यातून पुढे जायचं होतं. मीही अशाच परिस्थितीत होतो. तसेच, आम्ही एकत्र काम करत होतो, त्यावेळी आम्ही एकमेकांना भावनिक आधार दिला. आम्ही एकमेकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न केला. या सर्व भूतकाळातील गोष्टी आहेत. त्यावेळी माझ्याजवळ रेखा होती, तिच्याबरोबर मी माझे भावनिक क्षण शेअर करायचो. तिला आधाराची गरज असताना मी तिच्याजवळ होतो. असं नातं सहजासहजी विसरता येत नाही. जरी आम्ही आज एकत्र नसलो तरी, त्या खास क्षणांच्या सुंदर आठवणी अजूनही आमच्याकडे आहेत,” असं राज बब्बर म्हणाले होते.