काही उत्कृष्ट चित्रपटांमुळे भारतीय सिनेसृष्टीला एक वेगळी उंची गाठता आली. ‘राम तेरी गंगा मैली'(Ram Teri Ganga Maili) सारखे चित्रपट भारतीय सिनेसृष्टीत मैलाचे दगड ठरले. राजीव कपूर व मंदाकिनी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘राम तेरी गंगा मैली’ हा चित्रपट आजही उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. यातील गंगा हे पात्र लोकप्रिय ठरले. आता नेत्या व अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी गंगा पात्रासाठी पहिली पसंती त्या होत्या, असा खुलासा केला आहे. त्यांनी या चित्रपटाच्या फोटोशूटमध्येसुद्धा सहभाग नोंदवल्याचे सांगितले. मात्र त्यांचे वय अवघे १४ वर्षांचे होते. ही भूमिका करण्यासाठी त्या लहान होत्या. त्यामुळे त्यांच्याऐवजी ही भूमिका मंदाकिनी यांनी साकारली. मंदाकिनी यांनी गंगा हे पात्र साकारत अजरामर केले.

काय म्हणाल्या खुशबू?

अभिनेत्री खुशबू यांनी विकी लालवानीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले, “राज कपूर यांना मला राम तेरी गंगा मैली चित्रपटातून लॉन्च करायचे होते. त्यासाठी आम्ही फोटो शूटसुद्धा केले. ते फोटो पाहिल्यानंतर राज कपूर यांनी म्हटले होते की ही माझी गंगा आहे. गंगोत्री शेड्यूल पहिल्यांदा पूर्ण करण्याची योजना होती. पण, त्यावेळी बर्फ पडत होता. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा कोलकातामध्ये शूटिंग करायचे ठरवले. जिथे ते वेश्यागृहाचे दृश्य दाखवायचे होते. चित्रपटाच्या या भागात, हे पात्र आधीच बाळाची आई आहे, असा तो सीन होता. पण, मला त्यावेळी १४ वर्षेदेखील पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे राजजी म्हणाले, ती स्वत: लहान आहे. तिच्या हातात बाळ चांगले दिसणार नाही. त्यामुळे मी या चित्रपटातून पदार्पण करू शकले नाही”, अशी आठवण खुशबू यांनी सांगितली आहे.

राम तेरी गंगा मैली या चित्रपटाचे राज कपूर यांनी दिग्दर्शन व सह-लेखन केले होते. या चित्रपटात राजीव कपूर व मंदाकिनी प्रमुख भूमिकांत दिसले होते. चित्रपटातील कथेबरोबरच यातील गाणीदेखील लोकप्रिय ठरली. महत्वाचे म्हणजे, राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवले. राम तेरी गंगा मैली चित्रपटातील काही दृश्यावर आक्षेपदेखील घेण्यात आला होता.

हेही वाचा: सोनाली कुलकर्णीने खरेदी केली मर्सिडीज-बेंझ! अभिनेत्रीचं नव्या गाडीसह खास फोटोशूट, कारची किंमत किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज कपूर यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांचे भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदान मोठे आहे. अनेक चित्रपटात काम करत त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. अभिनयाबरोबरच त्यांनी दिग्दर्शनाची धुराही यशस्वीरित्या सांभाळली व भारतीय चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. २०२४ मध्ये राज कपूर यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात आली. ‘गौरी’, ‘चित्तोर विजय’, ‘आग’, ‘मेरा नाम जोकर’, ‘वाल्मीकी’, ‘जेल यात्रा’, ‘दिल की रानी’, ‘मेरा देश मेरा धर्म’, ‘नौकरी’, ‘गोपीचंद जासूस’ अशा अनेक चित्रपटांत राज कपूर यांनी काम केले. अभिनयाबरोबरच त्यांनी चित्रपटांचे दिग्दर्शन व निर्मितीसुद्धा केली.