आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसल्यापासून चर्चेत आहे. या कॉन्सर्टमध्ये अभिनेता नेहमीपेक्षा थोडा वेगळा दिसत होता. दरम्यान, या कॉन्सर्टमधील राजकुमारचे पापाराझींनी काढलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि राजकुमारने प्लास्टिक सर्जरी केल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यावर आता राजकुमारनं मौन सोडलं आहे.

नुकत्याच ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत राजकुमार राव म्हणाला, “मी कोणतीही प्लास्टिक सर्जरी केली नाही आहे. व्हायरल झालेला फोटो फक्त एक वाईट फोटो होता,असं आपण म्हणू शकतो. त्या फोटोला टच-अप्स केले आहेत. मला खूपदा वाटतं की, माझी त्वचा अशी नितळ आणि चमकदार असती, तर किती चांगलं झालं असतं. कारण- त्या फोटोत मी तसाच दिसत होतो. मी तेव्हा कोणताच मेकअप केला नव्हता; पण मलाही वाटलं की, तो फोटो खूप विचित्र दिसत होता. कॅमेऱ्यात कैद झालेला तो एक वाईट क्षण होता. मी कोणतीही प्लास्टिक सर्जरी केलेली नाही.”

हेही वाचा… स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”

“आठ वर्षांअगोदर मी हनुवटीसाठी काही फिलर वर्क केलेलं. कारण- मला आत्मविश्वास असल्यासारख दिसायचं होतं. तेव्हा माझ्या त्वचाशास्त्रज्ञानं मला सल्ला दिला होता आणि मी त्याप्रमाणे केलं. त्यानंतर माझा आत्मविश्वास वाढला का? तर हो. त्यानंतर मी आणखी चांगले चित्रपट केले आहेत आणि त्यामुळे माझा दृष्टिकोन बदलला आहे. अभिनय हे दृश्य माध्यम आहे. माझा याला विरोध नाही. जर एखाद्याला त्याचा आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि विज्ञान उपलब्ध असेल, तर कोणी ते का करणार नाही”, असंही राजकुमारनं नमूद केलं.

हेही वाचा… मसाबा गुप्ता-सत्यदीप मिश्रा होणार आईबाबा; गुडन्यूज शेअर करत म्हणाले, “आमच्या आयुष्यात…”

तथापि, तो पुढे म्हणाला, “पण प्लास्टिक सर्जरी मी करणार नाही. ती सर्जरी खूप महाग आणि वेळखाऊ आहे.”

दरम्यान, राजकुमार रावच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आगामी चित्रपट ‘श्रीकांत’मध्ये राजकुमार दिसणार आहे. हा चित्रपट १० मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ज्योतिका, अलाया फर्निचरवाला व मराठमोळा शरद केळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.