Ram Kapoor on net worth: अभिनेता राम कपूर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला होता. अभिनेत्याने चित्रपटांतदेखील काम केले. अनेकदा अभिनेता त्याच्या वक्तव्यांमुळेदेखील चर्चेत असतो.
काही दिवसांपूर्वीच राम कपूरने माझ्यासह साक्षी तन्वर आणि रोनित रॉय यांनी इतके पैसे कमावले आहेत की ते त्यांच्या पुढच्या चार पिढ्यांना पुरतील, असे वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्याची मोठी चर्चा झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राम कपूरने त्याच्या वक्तव्याचे स्पष्टीकरण दिले आहे.
राम कपूरने दिले स्पष्टीकरण?
‘रिपब्लिक ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत राम कपूर म्हणाला की, टीव्ही कलाकारांनी जर योग्य ठिकाणी गुंतवणूक केली, तरच त्यांना भविष्यात त्याचा उपयोग होऊ शकतो. अभिनेता म्हणाला, “मला असा प्रश्न विचारलेला की टीव्ही कलाकार किती कमाई करू शकतात? तो प्रश्न मला अस्पष्ट वाटला. त्यानंतर असे विचारले की तुझे असे कोणते सहकलाकार आहेत, ज्यांनी आतापर्यंत खूप पैसे कमावले आहेत? त्यावर मी माझ्यासह साक्षी आणि रोनितचे नाव घेतले होते.”
पुढे अभिनेता म्हणाला, “त्याच मुलाखतीत मला विचारले गेले की तुम्ही तीन जण किती कमाई करता? त्यावर मी म्हणालो होतो की, जर तुम्ही टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यशाच्या शिखरावर असाल, जर तुम्ही टीव्ही इंडस्ट्रीमधील यशस्वी कलाकार असाल आणि महत्त्वाचे म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करत असाल तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला पुरतील इतके पैसे कमावू शकता. अशा प्रकारची गुंतवणूक साक्षी आणि रोनित करतात, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.”
अभिनेता असेही म्हणाला, “टीव्हीवर काम करणे हे चित्रपटापेक्षा वेगळे आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या चित्रपटात काम करता, तेव्हा पुढची दोन वर्षे कदाचित चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार नाही. पण, जर तुम्ही टेलिव्हिजनवर काम करत असाल आणि तुमचा शो हिट असेल, तर तो तीन-चार वर्षे सुरू राहतो. साक्षीचा ‘कहानी घर घर की’ हा शो आठ वर्षे सुरू होता. अशा शोचे दर महिन्याचे मानधन खूप असते. अशी रक्कम जर तुम्हाला सतत आठ वर्षे मिळते, तेव्हा तुम्ही ते पैसे गुंतवले पाहिजेत. अशा गुंतवणुकीमुळे जेव्हा तुमचे करिअर संपते, तुम्हाला काम मिळत नाही, तेव्हा तुमच्याकडे तुमच्या गरजांसाठी पुरसे पैसे असतात. पण, जर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक केली नाही, तर तुम्हाला भविष्यात अडचणी येऊ शकतात.”
राम कपूर काय म्हणालेला?
राम कपूर ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता की, चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांइतके टीव्ही कलाकार पैसे कमावतात असे नाही. पण, तुम्ही एका गाजलेल्या मालिकेत काम करत असाल, जी सात-आठ वर्षे सुरू असेल आणि तुम्ही यशस्वी कलाकार असाल, तर तुमचे एका महिन्याचे मानधन हे आठ वर्षांच्या पगाराइतके असते. साक्षी, रोनित आणि माझ्यासारखे लोक जे २० वर्षांहून अधिक काळ टेलिव्हिजनवर काम करतात आणि जर योग्य ठिकाणी गुंतवणूक करत असतील. तर तीन-चार पिढ्यांना पुरतील इतके पैसे कमावले आहेत.”
राम कपूर हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता. ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’, ‘कहता है दिल’ अशा अनेक मालिकांमधून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. याबरोबरच त्याने ‘एजंट विनोद’, ‘स्टुडंट ऑफ द इअर’, ‘उडान’ अशा काही चित्रपटांमध्येही काम केले आहे.