Ranbir Kapoor and Ajay Devgns co star set up an omelette stand: पडद्यावर दिसणारे अनेक कलाकार बऱ्याचदा आर्थिक संकटांचा सामना करीत असतात. ते विविध मुलाखतींमधून याचा खुलासा करतात. आता रणबीर कपूर व सलमान खानबरोबर काम केलेल्या एका अभिनेत्याने त्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत वक्तव्य केले आहे.
अभिनेता इश्तियाक खानने सलमान खानबरोबर भारत या चित्रपटात काम केले होते आणि तो रणबीर कपूरच्या तमाशा या चित्रपटातदेखील दिसला होता. इश्तियाकने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून पदवी मिळवली आणि त्याने व्यावसायिक अभिनेता होण्यापूर्वी एका शाळेत अभिनयाचा शिक्षक म्हणूनही काम केले.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने खुलासा केला की, जेव्हा तो शिक्षक म्हणून काम करत होता, त्यावेळी त्याने जवळच एक ऑम्लेटचा स्टॉल लावला होता. एकदा त्याचा विद्यार्थी त्याच्या स्टॉलवर आला होता, त्यावेळी त्याला त्याची लाज वाटली. तो असेही म्हणाला की, मी ज्या वातावरणात वाढलो, त्याचा माझ्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव आहे.
“त्यानं त्याच्या वडिलांना…”
इश्तियाक खानने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो म्हणाला, “संध्याकाळी आम्ही काही जण अंड्यांचा स्टॉल लावायचो. मी कॉलेजच्या नाटकांसाठी, संगीत आणि डान्ससाठी कॉन्ट्रॅक्टदेखील स्वीकारायचो. एके दिवशी माझा एक विद्यार्थी माझ्या स्टॉलवर आला. तो त्याच्या सरांना म्हणजेच मला त्या स्टॉलवर पाहून आश्चर्यचकित झाला. मला त्यावेळी लाज वाटली होती.”
इश्तियाक पुढे म्हणाला, “मुलं माझा आदर करत होती. शाळेत मुलांना मी माझा चेहरा कसा दाखवू हे मला कळत नव्हतं. मी निराश झालो. मी दुसऱ्या दिवशी शाळेत गैरहजर राहिलो. मग तो मुलगा पुन्हा आला, त्यावेळी तो त्याच्या वडिलांसह स्कूटरवरून आला. त्यानं त्याच्या वडिलांना सांगितलं, की हे आमचे शिक्षक आहेत. त्याच्या वडिलांनी माझ्याकडे पाहिले; पण ते काहीही बोलले नाहीत. तेव्हा माझ्या एका वरिष्ठानं मला समजावून सांगितलं की, तू चोरी करत नाहीस ना? मग तुला लाज का वाटते? तुझ्या कामाबद्दल लाज बाळगू नको.”
पुढे इश्तियाक खान त्याच्या मित्रांबद्दल म्हणाला की, माझ्या सगळ्या मित्रांना माहीत होतं की, माझ्याकडे पैसे नाहीत. एकदाही त्यांनी माझ्याकडे चहाचे पैसे मागितले नाहीत. माझ्याकडे सायकल किंवा स्कूटर नव्हती. पण, माझ्या मित्रांची सायकल, स्कूटर मी अधिकारानं वापरायचो. त्या गोष्टी माझ्या नाहीत याची त्यांनी मला कधीच जाणीव करू दिली नाही. मी ज्या वातावरणात वाढलो, त्यामुळे मी एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो. जर मी द्वेष असलेल्या वातावरणात वाढलो असतो, तर कदाचित मी एक चांगला माणूस झालो नसतो.
“जेव्हा माझ्या गावात होतो, त्यावेळी माझी सर्व स्तरांतील लोकांशी मैत्री होती. श्रीमंत मुलांपासून ते असे लोक जे सगळ्यांशी बोलत नाहीत, अशा सर्वांशी माझी मैत्री होती. मुंबईत काही लोक दलित आणि मुस्लिमांना घरं भाड्यानं देत नाहीत. हा माझ्यासाठी खूप मोठा सांस्कृतिक धक्का होता”, असेही अभिनेता म्हणाला. इश्तियाक ने ‘तीस मार खान’, ‘मैदान’ व ‘विकी विद्या का वो वाला व्हिडीओ’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.