Rasha Thadani Telugu Debut : रवीना टंडनने अनेक हिंदी चित्रपटांत विविध भूमिका साकारत तिच्या अभिनयाने व सौंदर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. तिच्या पावलावर पाऊल ठेवत तिच्या लेकीनेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिची लेक राशा थडानीने अजय देवगणची निर्मिती असलेल्या ‘आझाद’ चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं.

राशा यानंतर ‘मुंज्या’ फेम अभय वर्मासह मोठ्या पड्यावर नवीन भूमिकेतून झळकणार आहे. अशातच आता नुकतीच तिने तिच्या अजून एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. राशा थडानी बॉलीवूडनंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. तिने स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.

राशा थडाणी करणार दाक्षिणात्य इंडस्ट्रीत पदार्पण

राशा थडानी दाक्षिणात्य दिग्दर्शक अजय भुपती यांच्या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. तिने तिच्या आगामी तेलुगू सिनेमाची घोषणा इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत केली आहे. यावेळी तिने या चित्रपटातील तिचा लूक रीव्हिल करत त्याला “नवीन सुरुवात आणि खूप खूप आभार. मी तेलुगू सिनेमात पदार्पण करत आहे, धन्यवाद अजय सर या संधीसाठी. मी पुढच्या प्रवासाठी खूप उत्सुक आहे,” अशी कॅप्शन दिली आहे.

अजय भूपती दिग्दर्शित #Ab4 या चित्रपटाची निर्मिती अश्विनी दत्त यांनी केली आहे. अजय भूपती यांचा हा चौथा तेलुगू सिनेमा आहे. यामध्ये राशा थडानीबरोबर महेश बाबूचा पुतण्या आणि रमेश बाबुचा मुलगा घटामनेनी जयकृष्णाही झळकणार आहे; तर राशाने शेअर केलेल्या या पोस्टमधील तिचा लूक लक्षवेधी असल्याचं दिसतं. यावेळी तिने निळ्या रंगाची जिन्स, काळ्या रंगाचा टॉप आणि मोकळे केस असा लूक केल्याचं दिसतं. यावेळी ती दोनचाकी गाडीवर बसली आहे, त्यामुळे या चित्रपटात तिची भूमिका कशी असेल हे पाहणं रंजक ठरेल.

अजय देवगणच्या ‘आझाद’मध्ये राशा त्याचा पुतण्या अमन देवगणबरोबर झळकलेली. या चित्रपटातील गाण्यामधील राशाच्या नृत्याने अनेकांचं लक्ष वेधलं होतं, तर तिच्या नृत्य कौशल्यासाठी तिचं अनेकांकडून कौतुकही झालं होतं. यासह ती अभय वर्मासह Laikey laikaa या चित्रपटातूनही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.