Raveena Tandon on Air India Flight : गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून) एअर इंडियाचं एक विमान कोसळलं. या दुर्घटनेत २७४ जणांचा बळी गेला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत विमानातील २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच विमान मेघानी नगरमधील ज्या रहिवासी भागात कोसळलं तिथले ३३ जण यामध्ये मरण पावले आहेत. या दुर्घटनेमुळे देशात शोकाकूल वातावरण पाहायला मिळत आहे.
या विमान अपघातामुळे एअर इंडिया या विमान कंपनीबद्दल आता अनेकांचा संशय आणि अविश्वास पाहायला मिळत आहे. याचदरम्यान एका प्रसिद्ध अभिनेत्रीने एअर इंडिया कंपनीचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अभिनेत्री रवीना टंडनने नुकताच एअर इंडिया कंपनीच्या विमानातून प्रवास केला आहे आणि या प्रवासाचे काही फोटो तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
या प्रवासादरम्यान तिने विमान कंपनी आणि विमानातील कर्मचाऱ्यांसाठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने असं म्हटलंय, “एक नवीन सुरुवात… सर्व अडचणींमधून पुन्हा उठून उडण्यासाठी आणि अधिक ताकदीने पुन्हा नव्याने सुरुवात करण्यासाठी. ज्या कुटुंबांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत त्यांच्याबद्दल संवेदना व्यक्त करते. हे कधीही भरून न येणारं नुकसान आहे. एअर इंडियाला शुभेच्छा. पुन्हा एकदा खंबीर होण्यासाठी आणि या संकटावर मात करण्यासाठी तुम्हाला शक्ती मिळावी.”
रवीना टंडनने शेअर केलेल्या पोस्टचं कलाकारांसह चाहत्यांकडून कौतुक
रवीना टंडनने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तसंच अभिनेत्रीने विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवल्याबद्दल आणि त्यांना पुन्हा धीर दिल्याबद्दल अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. रवीनाआधी वीर दासनेही एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमधून त्याने झालेल्या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं होतं. तसंच कर्मचारी आणि विमान कंपनीला पाठिंबा दिला होता.
विमान दुर्घटनेतील मृतांना आणि जखमींना टाटा समूहाकडून आर्थिक मदत
अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या कुटुंबियांना आणि एकमेव बचावलेल्या व्यक्तीला २५ लाख रुपयांची भरपाई देणार असल्याची घोषणा केली आहे. टाटा सन्सने यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची भरपाई देण्याची घोषणा केली आहे. जखमी झालेल्यांचा वैद्यकीय उपचाराचा खर्चही टाटाकडून उचलला जाणार असल्याचं टाटा ग्रुपकडून सांगण्यात आलं आहे.