Renuka Shahane Talk’s About Anushka Sharma Starrer Chakda Xpress Getting Shelved : अनुष्का शर्मा २०२१ मध्ये मुलीच्या जन्मानंतर अभिनयक्षेत्रात पुनरागमन करण्यास सज्ज होती. त्यावेळी तिने झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित चरित्रपटाचं ‘चकदा एक्स्प्रेस’चं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. यामध्ये रेणुका शहाणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. परंतु, आता चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट माजी भारतीय महिला क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्यावर आधारित आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे. परंतु, अद्याप हा चित्रपट प्रदर्शित झाला नाहीये. ‘फ्री प्रेस जरनल’च्या वृत्तानुसार पूर्वी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार होता. परंतु,काही कारणांनी ती डील रद्द झाली. आता यातील अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी याबाबत त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार आता हा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याचं म्हटलं जात आहे. चित्रपटाचं संपूर्ण चित्रीकरण पूर्ण झाल्यामुळे ही धक्कादायक गोष्ट आहे. अशातच आता रेणुका यांनीसुद्धा नाराजी व्यक्त केल्याचं दिसतं. यामध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. आता त्यांनी ‘एनडी टीव्ही’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं.
‘चकदा एक्स्प्रेस’बद्दल रेणुका शहाणे यांची प्रतिक्रिया
रेणुका म्हणाल्या, “मला खूप वाईट वाटलं, कारण या चित्रपटासाठी प्रत्येकाने खूप मेहनत घेतली होती. अनुष्कानेही यासाठी स्वत:वर खूप काम केलं होतं. यामध्ये मी जे सीन केले ते खूप चांगले होते आणि म्हत्त्वपूर्ण होते. विशेष करून क्रीडा क्षेत्रातील स्त्रियांसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे.”
अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “झूलन गोस्वामी खूप छान आहेत. गरीब कुटुंबातून असतानाही त्यांनी मेहनतीने इतकं सगळं मिळवलं. तरीसुद्धा पुरुष व महिला खेळाडूंमधील भेदभाव याबद्दल आजही बोललं जातं. त्यामुळे मला वाटतं, ‘चकदा एक्स्प्रेस’ हा क्रीडा विषयाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.”
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये दिव्येंदु भट्टाचार्य यांनीसुद्धा ‘न्यूज १८’शी संवाद साधताना याबाबत सांगितलं होतं. ‘चकदा एक्स्प्रेस’बद्दल ते म्हणाले, “हा खूप छान चित्रपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची ते वाट पाहत आहेत. त्यांनी यामध्ये असंही सांगितलेलं की अनुष्का शर्माने यामध्ये उत्तम अभिनय केला आहे.”