Richa Chadha On Her Interfaith Marriage : बॉलीवूडमधील कायमच चर्चेत असणाऱ्या जोडप्यांपैकी लोकप्रिय जोडपे म्हणजे अभिनेत्री रिचा चड्ढा आणि अली फजल. ‘फुकरे’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. या भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि नंतर हळूहळू प्रेमात झालं. २०२० मध्ये लॉकडाऊनदरम्यान रिचा आणि अलीने मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

रिचा चड्ढा आणि अली फजल यांचं लग्न आंतरधर्मीय असून दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच नुकत्याच एका मुलाखतीत रिचाने तिच्या अलीबरोबरच्या लग्नाबद्दल पुन्हा एकदा प्रतिक्रिया दिली. यावेळी अभिनेत्रीने सांगितलं की, तिचा आंतरधर्मीय विवाह असला तरी ते दोघे एकमेकांच्या धर्माचं सन्मान करतात.

इंडियन एक्सप्रेसच्या Expresso या कार्यक्रमात रिचाने दोघांच्या नात्याबद्दल असा म्हटलं की, “माझं आणि अलीचं लग्न आंतरधर्मीय आहे. अली आणि मी एकमेकांच्या धर्माचं सन्मान करतो. या नात्यातून मला खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात.”

यापुढे रिचा म्हणाली, “अली आणि मी दोघेही धर्मनिरपेक्ष, पुरोगामी आणि आध्यात्मिक दृष्टिकोन असलेले व्यक्ती आहोत. आम्ही एकमेकांच्या धर्माचे काही रितीरिवाज पाळतो, कारण त्या गोष्टींचा अनुभव घेणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.”

यानंतर ती सांगते, “अलीच्या लखनौमधील घरी ईद साजरी करण्यासाठी जायला मला खूप आवडतं. तिथं सर्व धर्मातील लोक एकत्र येऊन बिर्याणी, पुलावसारखी पारंपरिक खाद्यपदार्थ बनवतात. जैन समुदायासाठी वेगळा पदार्थही तयार होतो. अलीची नव्वद वर्षांची आजी पान बनवते. त्यामुळे एकूणच तिथलं वातावरण खूप आनंददायी असतं.”

दरम्यान, यापूर्वी ‘गलाटा इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल म्हटलं होतं की, “तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल जर ठाम राहिलात आणि तुमचे कुटुंबीय तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले तर बाकी कोणत्याच गोष्टींनी फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता, तेव्हा त्यात कोणतेच फिल्टर्स नसतात. तुम्ही प्रेमात असता, तेव्हा प्रेम ही एकच भावना महत्त्वाची असते.”