अभिनेता रितेश देशमुख व जिनिलीया देशमुख ही बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडी आहे. महाराष्ट्रात हे दोघे लाडके दादा-वहिनी म्हणूनही ओळखले जातात. त्यामुळे या दोघांचा मोठा चाहतावर्ग आहे. या जोडीमध्ये एकमेकांबद्दल असलेलं प्रेम, आदर या गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावतात. नेहमीच हे दोघे खंबीरपणे एकमेकांच्या मागे उभे असतात. एकमेकांच्या कलाकृतींना कायम पाठिंबा देत असतात.

अशातच आता रितेशने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करीत जिनिलीयाच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाला पाठिंबा दिला आहे. एक्सवर आणि इन्स्टाग्रामवर त्यानं चित्रपटाच्या ट्रेलरचं आणि कलाकारांचं कौतुक केलं आहे. रितेशनं एक्सवर “असामान्य ट्रेलर..” असं लिहीत चित्रपटाच्या ट्रेलरचं कौतुक केलं होतं. काल (१३ मे) ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यावेळी अनेकांनी ट्रेलरचं कौतुक केलं. अशातच आज पुन्हा रितेशनं या चित्रपटाच्या ट्रेलरचं, तसेच त्याची पत्नी जिनिलीया व आमिर खानचं कौतुक केलं आहे.

इन्स्टाग्रामवर ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर करीत तो म्हणाला, “हा चित्रपट कधी प्रदर्शित होतोय याची वाट बघत आहे.” पुढे त्याने जिनिलीया व आमिर खान यांचा उल्लेख करीत “माझ्या या दोन आवडत्या कलाकारांना पहिल्यांदा एकत्र काम करताना पाहण्यासाठी मी उत्सुक आहे.” असं म्हटलं आहे.

आमिर खानची निर्मिती असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट हॉलीवूड चित्रपटाचा रिमेक आहे. तर आर. एस. प्रसन्न यांनी ‘सितारे जमीन पर’चं दिग्दर्शन केलं आहे. आमिर खान व जिनिलीया देशमुख यांची मुख्य भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट येत्या २० जूनला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा पुढचा भाग असून, आता पुन्हा एकदा आमिर खान एका वेगळ्या कलाकृतीमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आमिर खान व जिनिलीया देशमुख यांनी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र काम केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जिनिलीया देशमुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तिनं आजवर ‘तुझे मेरी कसम’, ‘जाने तू’, ‘तेरे नाल लव हो गया’, ‘लय भारी’, ‘माऊली’, ‘वेड’, ‘संतोष सुब्रमण्यम’, ‘उथामा पुथिरन’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जिनिलीयानं हिंदी, मराठी, तेलुगू, तमीळ यांसारख्या भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिनं आजवर अनेक दिग्गज कलाकारांसह काम केलं आहे. जिनिलीयानं तिच्या सहज अभिनयानं अनेकांची मनं जिंकली आहेत.