Ronit Roy recalls surviving hunger and poverty: अभिनेता रोनित रॉय हा मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजसाठी ओळखला जातो. त्याने ज्या भूमिका साकारल्या, त्या मोठ्या प्रमाणात गाजल्या. आज रोनित रॉय हा यशस्वी अभिनेता म्हणून ओळखला जातो.
जेव्हा रोनितने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आणि काम करण्यासाठी धडपड सुरू केली, त्यावेळी त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ९० च्या दशकात अभिनेत्याला अनेक संकटांचा सामना करावा लागला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने याबाबत वक्तव्य केले आहे.
“माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात…”
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, “१९९२ साली प्रदर्शित झालेल्या दीपक बलराज विज यांच्या ‘जान तेरे नाम’ या चित्रपटातून पदार्पण केले. मी कमी लोकांशी बोलायचो. त्यामुळे मी अनेक संभाषणांचा भाग नसायचो. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला यश का मिळाले नाही, हे मला प्रामाणिकपणे माहीत नाही. आधी मी यावर विचार करायचो; पण आता करत नाही. मी स्वत:च्या विश्वात असायचो. त्याबरोबरच मी काम मागण्यासाठी लोकांकडे जाणे थांबवले. त्यामुळेदेखील त्यांनी मला संधी दिली नसण्याची शक्यता आहे.
रोनित रॉयने याच मुलाखतीत खुलासा केला की, चित्रपट पदार्पणापूर्वी त्याची आर्थिक स्थिती फार वाईट होती. दिवसातील एक वेळचे जेवण होऊ शकेल इतकेच त्याच्याकडे पैसे होते. कधी कधी त्याला पैशाअभावी जेवणही मिळत नसे. रोनित रॉयने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला, “वांद्रे स्टेशनजवळ एक लोकप्रिय ढाबा आहे. मी तिथे रोज जेवण करायचो. मला एक वेळचे जेवण परवडत असे. त्यामुळे मी तिथे एक दिवस डाळ व दोन रोटी आणि एक दिवस पालक पनीर व दोन रोटी, असे जेवण करत असे.
एक दिवस माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मी तिथल्या माणसाला सांगितलं की, मला रोटी आणि कांदा दे. त्याने मला रोटी आणि डाळ दिली. मला त्याला म्हणालो की, मी डाळ मागितली नव्हती. तो म्हणाला ठीक आहे. आज तुझा डाळ आणि रोटी खाण्याचा दिवस आहे. आज डाळ माझ्याकडून घे. याचे पैसे देऊ नकोस. हे सांगताना रोनितच्या डोळ्यांत पाणी आले. अभिनेता म्हणाला की, आजही त्या माणसाचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर आहे.
अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवल्यानंतरही तो अत्यंत जबाबदारीने पैसे खर्च करीत असे, कारण- त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. रोनित रॉय म्हणाला, “मी माझ्या पहिल्या चित्रपटातून ५० हजार कमावले. त्यांनी मला दर महिन्याला चार हजार असे टप्याटप्याने दिले. पण, ती रक्कम माझ्यासाठी खूप मोठी होती. पदार्पणानंतरही, माझे खर्च भागवण्यासाठी मी केलेल्या चित्रपटांची मदत झाली नाही”, असे म्हणत अभिनेत्याने त्याचा संघर्षचा काळ सांगितला.