Ronit Roy opens up about his children: कलाकारांची मुले अभिनय क्षेत्रातच काम करतील, असे अनेकदा म्हटले जाते. आपल्या आवडत्या कलाकारांची मुले नेमके कोणत्या क्षेत्रात काम करतात, हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक असतात.
आता लोकप्रिय अभिनेता रोनित रॉयने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या मुलांबद्दल वक्तव्य केले आहे. रोनितने नुकतीच हिंदी रशला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याची मुले अभिनय क्षेत्रात काम करतील का, यावर वक्तव्य केले आहे.
“मी माझ्या मुलांना कधीच…”
रोनित रॉय म्हणाला, “माझी मुलगी सध्या यूएससी (University of Southern California) मध्ये शिक्षण घेत आहे, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जास्त दिसत नाही. ती लोकांच्या नजरेत येत नाही. माझा मुलगा अगस्त्य मात्र इथेच आहे. मी माझ्या मुलांना कधीच सांगितलं नाही की त्यांनी करिअरमध्ये काय करायला पाहिजे. मी त्यांना फक्त इतकंच सांगतो की माझ्या आयुष्यात फक्त दोन प्रोजेक्ट आहेत आणि ते प्रोजेक्ट म्हणजे ते दोघे आहेत.
मुलांविषयी बोलताना रोनित रॉय म्हणाला की, पालकांना नेहमी हेच वाटत असते की त्यांच्या मुलांबरोबर नेहमीच चांगले व्हावे. आपल्या मुलांबरोबर सर्वोत्तम गोष्टी घडाव्यात, पण पालक सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. रोनित म्हणाला, “वडील म्हणून मी खूप गोष्टी करू शकतो, पण मी त्यांचे नशीब लिहिले नाही. मुलांच्या प्रवासात त्यांना साथ देणं, त्यांना समजून घेणं याच गोष्टी वडील करू शकतात. अगस्त्य चांगला मुलगा आहे, त्याने स्वत:साठी ठरवलेल्या ध्येयांप्रति तो दृढनिश्चयी आहे. “
पुढे रोनित असेही म्हणाला की, “अगस्त्य गोष्टी समोर दिसतात त्यावर विश्वास ठेवतो. या इंडस्ट्रीसाठी तो खूप भोळा आहे. लोक जसे समोर दिसतात त्यावर विश्वास ठेवतो. लोकांचा काय हेतू असेल यावर तो शंका घेत नाही. तो माझ्यासारखा आहे. आम्हाला दोघांना बऱ्यापैकी सारख्याच गोष्टी आवडतात. आम्हा दोघांनाही चित्रपट आणि मार्शल आर्ट आवडते. मला वाटते त्याचा निरागसपणा तसाच राहावा. पण, त्याच्यामध्ये योद्ध्यासारखी खंबीरता यावी. त्याची मानसिकता तशी तयार व्हावी. एकदा त्याची मनस्थिती तयार झाली की मग तो इतरांकडून शिकण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये काम करू शकतो, कारण त्यामुळे त्याला कळू शकेल की तो काय करत आहे; त्याच्याबरोबर काय घडत आहे. “
दरम्यान, रोनितचा भाऊ रोहित रॉयदेखील अभिनेता आहे. रोहित रॉयची मुलगीदेखील कियारा सध्या ब्राउन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे. कियारा अभिनय क्षेत्रात येईल का, यावर रोहित म्हणाला की सध्या ती अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे. त्यानंतर ती अभिनय क्षेत्रात काम करू शकते. तिने काम करू नये असे काहीही कारण नाही. रोहित असेही म्हणालेला, त्याच्या मुलीने इंडस्ट्रीतील इतर कोणाबरोबरही काम करावे, कारण त्याला वाटते, कलाकार स्वत:च्या मुलांना दिग्दर्शित करू शकत नाहीत.