काही चित्रपटांची रिलीजआधी इतकी क्रेझ असते की तो ब्लॉकबस्टर होईल, असं वाटतं; पण रिलीज झाल्यावर मात्र प्रेक्षक पाठ फिरवतात. असाच एक चित्रपट म्हणजे ‘आदिपुरुष’. मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा २०२३ मधील सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट होता, किंबहुना तो भारतातील आजवरच्या सर्वात महागड्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे.

‘आदिपुरुष’मध्ये प्रभास, कृती सेनॉन, सैफ अली खानसह अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी होती. ‘आदिपुरुष’चं प्रमोशन दणक्यात करण्यात आलं होतं, पण चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यावर प्रचंड टीका झाली. अॅडव्हान्स बुकिंग चांगली झाल्याने दमदार ओपनिंग करणाऱ्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आणि तो बॉक्स ऑफिसवर आदळला.

‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका करणाऱ्या सैफने या चित्रपटाबद्दल मोठा खुलासा केला आहे. या चित्रपटांवर टीका करणाऱ्यांपैकी एक त्याचा मुलगा तैमूर अली खानदेखील आहे. तैमूरला बाबाचा हा चित्रपट अजिबात आवडला नाही. सैफला तैमूरची माफी मागावी लागली. तैमूर जे चूक असेल त्याला स्पष्टपणे चूक म्हणतो, असं सैफने सांगितलं.

नेटफ्लिक्स इंडियाच्या यूट्यूब चॅनलवर एका व्हिडीओत सैफ अली खान व जयदीप अलहावत यांनी विविध विषयावर गप्पा मारल्या. या गप्पांचं निमित्त होतं दोघांचा नेटफ्लिक्सवर नुकताच आलेला चित्रपट ‘द ज्वेल थीफ’. जयदीप अहलावतने सैफला विचारलं की त्याची मुलं त्याचे चित्रपट पाहतात का? यावर सैफने मजेशीर उत्तर दिलं.

सैफ अली खानने तैमूरची मागितली माफी

सैफ अली खान हसत म्हणाला, “मी अलिकडेच तैमूरला आदिपुरुष दाखवला. मग थोड्या वेळाने त्याने माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं. मी त्याला म्हणालो, सॉरी. मग तैमूर म्हणाल, ‘ठीक आहे.’ त्याने मला माफ केलं.” सैफ अली खानने ‘आदिपुरुष’मध्ये रावणाची भूमिका केली होती. तर कृती सेनॉन माता सीतेच्या भूमिकेत होती. यामध्ये दाक्षिणात्य स्टार प्रभास रामाच्या भूमिकेत होता. जून २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटावर प्रचंड टीका झाली होती. तसेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘आदिपुरुष’चे बजेट व कलेक्शन

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’च्या निर्मितीसाठी तब्बल ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या चित्रपटाने जगभरात ३९२.७० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील व्हीएफएक्स व डायलॉग्स तसेच कलाकारांच्या वेशभूषेवरूनही प्रचंड टीका झाली होती.