अभिनेत्री सोहा अली खान ही अनेकदा तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट, तसेच तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. आता अभिनेत्रीने ‘पतौडी पॅलेस’मधील तिच्या मालकीच्या जागेबद्दल वक्तव्य केले आहे.
जेव्हा मन्सूर अली खान यांचे निधन झाले, त्यावेळी पतौडी पॅलेस एका हॉटेल साखळीला भाड्याने देण्यात आला होता. सैफ अली खानने हा पॅलेस परत मिळवला. आता तो या १२०० कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. मात्र, या पॅलेसमधील काही जागा ही सोहा अली खानच्याही मालकीची आहे.
सोहा अली खान काय म्हणाली?
सोहा अली खानने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, “पतौडी पॅलेसमधील २ बीएचके माझ्या मालकीची आहे. ही जागा आधी जनरेटर रूम म्हणून वापरली जायची. जेव्हा पॅलेस भाड्याने दिला होता, त्यावेळी माझे आई-वडील तिथे राहायचे.”
पुढे सोहाने कुटुंबात कधीही भेदभाव केला नाही, याबद्दलही वक्तव्य केले. ती म्हणाली, “माझ्या आयुष्यातील गोष्टी फार मोठ्या नव्हत्या. मला जे करायचे होते, त्या सर्व गोष्टी मी केल्या. मी काय करावे, याविषयी माझ्या कुटुंबीयांनी त्यांची मते माझ्यावर लादली नाहीत. घरातील मुलांना आधी दूध प्यायला मिळेल, घरातील मुली स्वत: खाण्याअगोदर इतरांना जेवण देतील, अशा अपेक्षा कधीच माझ्याकडून केल्या नाहीत.”
“तू काळी होशील म्हणून बाहेर खेळू नकोस किंवा मुलींनी अमुक अशा पद्धतीने वागले पाहिजे, अमुक कपडे घातले पाहिजेत, असे कधीच मला सांगितले गेले नाही. माझ्या घरात असे कधीच घडले नाही. माझे वडील प्रगतिशील विचारांचे होते. या सगळ्यांमुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास आला. मला पाहिजे असणाऱ्या आणि शक्य आहेत त्या गोष्टी मी करू शकते, असा विश्वास मला वाटू लागला. मला फक्त त्यासाठी कठोर मेहनत करायची आहे.”
पतौडी पॅलेसमधील तिच्या मालकीच्या २ बीचएचके जागेबद्दली सोहा असेही म्हणाली की जेव्हा माझे आई-वडील तिथे राहण्यास गेले, तेव्हा ती फक्त जनरेटर रूम होती. पण, त्यांनी त्याचे रूपांतर उत्तम जागेत केले.”
सोहा पुढे असेही म्हणाली, “मला सर्वांत मोठ्या मुलाला वारसा हक्काने मिळणाऱ्या संपत्तीच्या कायद्याबद्दल, तसेच मुस्लिम कायद्याचीही माहिती आहे.”
दरम्यान, सोहा अली खानने दिल मांगे मोर, शादी नंबर १, खोया खोया चांद, दिल कब्बडी, ९९ अशा चित्रपटांत काम केले आहे.