Mohit Suri calls Ahaan Panday a fraud : काही चित्रपट, काही कलाकार व काही दिग्दर्शक हे मोठ्या प्रमाणात गाजतात. अगदी बॉक्स ऑफिसवर ते धुमाकूळ घालतात आणि सर्वत्र चर्चेचा विषय ठरतात. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला सैयारा अशा चित्रपटांपैकीच एक आहे.
मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात नवोदित अभिनेता अहान पांडे प्रमुख भूमिकेत आहे. तसेच, त्याच्याबरोबर अनित पड्डादेखील प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला आहे. अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड त्याने मोडले आहेत.
“मी जेव्हा अहानला भेटलो तेव्हा खूप….”
आता मोहित सुरीने अहान पांडेला ‘सैयारा’मध्ये कास्ट करण्याबद्दल वक्तव्य केले. अहानने ‘सैयारा’मध्ये क्रिश कपूर ही भूमिका साकारली आहे. मोहित सुरीने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत दिग्दर्शक म्हणाला, “मला सुरुवातीलाच त्याची ऑडिशन पाहिल्यावर वाटले होते की, तो या भूमिकेसाठी फारच चांगला आहे. त्याला त्या भूमिकेसाठी कास्ट करण्यासाठी कोणीही माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही की कोणी दबाव टाकला नाही. “
“एका ज्येष्ठ निर्मात्यानं मला त्याचं नाव सुचवलं होतं. त्यांनी मला म्हटलं होतं की, हाच तुझा क्रिश कपूर आहे. तुला जसं पात्र पाहिजे, तसा तो आहे. तू त्याला एकदा भेटलं पाहिजे. मी जेव्हा अहानला भेटलो तेव्हा खूप सभ्य, मृदुभाषी व थोडा भित्रा वाटला; पण मला तर एक बेजबाबदार आणि वाईट मुलगा माझ्या चित्रपटाच्या भूमिकेसाठी पाहिजे होता.”
“अचानक मला ही गोष्ट जाणवली की, तो मोहित सुरीला बघत आहे. ‘आशिकी’च्या दिग्दर्शकाला बघत आहे. मग मी त्याला माझ्याबरोबर जेवणासाठी घेऊन गेलो. त्यावेळी मला ज्यांनी त्याचे नाव सुचवले होते ते म्हणाले की, जर तुलाही आता वाटत असेल की, हा तुझ्या पात्रासाठी योग्य नाही, तर त्याला नकार दे. मी त्याला नकार देणार होतो. पण, मी त्याला म्हणालो की, मला सर म्हणणे बंद कर आणि मोहित म्हण. त्यानं यामध्ये आणखी एक पुढचं पाऊल टाकलं आणि तो मला ‘ब्रो’ म्हणू लागला. मग मी त्याच्याबरोबर काही वेळ घालवला आणि त्यानंतर मला अहानमध्ये क्रिश कपूर दिसला. उद्धट, वाईट वागणारा व मनानं चांगला असणारा मुलगा मला भेटला.”
मोहित सुरीने असाही खुलासा केला की, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यानं त्याचे ऑडिशनचे जुने व्हिडीओ पाठवले आणि विचारले की, या मुलाला तुम्ही कसे कास्ट केले? खरंच जर ते व्हि़डीओ मी आधीच पाहिलं असतं, तर मी त्याला कास्ट केलंच नसतं. त्याला माहीत होतं की, त्या व्हिडीओमध्ये तो चांगले काम करीत नव्हता. त्यानं मुद्दाम ते व्हिडीओ मला पाठवले होते. मी त्याला म्हणालो की, तू फसवलं आहेस.”
पुढे मोहित सुरी अहानचे कौतुक करीत म्हणाला, “माझ्या चित्रपटात त्याची एक बाजू दिसली आहे. पण, तो मजा करू शकतो, उत्तम डान्स करू शकतो. आणखी एखादा दिग्दर्शक त्याच्यासाठी तशी भूमिका तयार करील. त्यानं ज्यासाठी तयारी केली आहे. त्याची ती बाजू जगासमोर येईल.”
दरम्यान, अहानने यापूर्वी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. आता आगामी काळात तो कोणत्या चित्रपटात दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.