हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम खान यांची ओळख केवळ सलमान खानचे वडील अशी नाही तर एक प्रसिद्ध लेखक अशीही आहे. २४ नोव्हेंबर १९३५ मध्ये जन्मलेले सलीम खान आज ८७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार स्टार होण्याचं श्रेय सलीम खान यांना जातं. जावेद अख्तर- सलीम खान ही एकेकाळची सर्वात गाजलेली जोडी होती. अनेक हिंदी चित्रपटांच्या पटकथा या जोडीने लिहिल्या आहेत. पण सलीम खान यांचा एक लेखक म्हणून प्रवास अजिबात सोपा नव्हता. एक प्रसिद्ध अभिनेत्याने तर त्यांचा ‘माझ्या कुत्र्यालाही तुझी आवडलेली नाही’ असं म्हणत थेट अपमान केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सलीम खान यांनी त्यांच्या करिअरमध्ये आणि खासगी आयुष्यातही अनेक चढ-उतार पाहिले आहेत. अनेक त्यांनी लिहिलेल्या पटकथा कलाकारांच्या पसंतीस उतरत नसत आणि ते चित्रपटात काम करण्यास नकार देत. असंच काहीसं जंजीर चित्रपटाची पटकथा लिहिल्यानंतर घडलं होतं. सलीम-जावेद लिखित ‘जंजीर’ चित्रपट १९७३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून अभिनेते अमिताभ बच्चन सुपरस्टार झाले. पण त्याआधी एका प्रसिद्ध अभिनेत्याने या चित्रपटात काम करण्यास नकार देत सलीम खान यांचा मोठा अपमान केला होता.

आणखी वाचा- अमिताभ बच्चन यांच्यामुळे तुटली सलीम-जावेद यांची जोडी? वाचा त्यावेळी नेमकं काय घडलं

जंजीर चित्रपटाची कथा- पटकथा सलीम- जावेद यांनी लिहिली होती. तर दिग्दर्शन प्रकाश मेहरा यांनी केलं होतं. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असली तरीही अमिताभ यांना साइन करण्याआधी सलीम खान बऱ्याच अभिनेत्यांकडे गेले होते. त्यांना कथा ऐकवली आणि आपल्या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना विनंती केली होती. सलीम- जावेद यांना त्यावेळी या चित्रपटासाठी अभिनेते राजकुमार योग्य ठरतील असं वाटत होतं. त्यासाठी ते राजकुमार यांच्या घरी गेले होते.

सलीम- जावेद यांनी राजकुमार यांना आपल्या चित्रपटाची कथा ऐकवली त्यावेळी राजकुमार बॉलिवूडमधील सर्वात आघाडीचे अभिनेते होते. कथा ऐकवल्यानंतर सलीम यांनी राजकुमार यांना तुम्ही आमच्या चित्रपटात काम कराल का? असं विचारलं. तेव्हा राजकुमार म्हणाले, “माझा कुत्रा ठरवेल की मी तुझ्या चित्रपटात काम करायचं की, नाही.” त्यानंतर राजकुमार यांनी आपल्या कुत्र्याला बोलावलं आणि कथा त्याच्यासमोर ठेवली. ते पाहून कुत्रा भुंकू लागला. यावर राजकुमार सलीम खान यांना म्हणाले, “जर माझ्या कुत्र्यालाच तुझी पटकथा आवडली नाही तर मला कशी काय आवडेल.”

आणखी वाचा- पत्नी अन् चार मुलं असूनही सलीम खान यांचं अफेअर; कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता सलमानच्या वडिलांनी हेलनशी केलं होतं लग्न

राजकुमार यांनी एवढा अपमान केल्यानंतर सलीम खान यांनी धीर सोडला नाही. त्यांनी त्यानंतर ही कथा धर्मेंद्र, संजीव कुमार आणि देव आनंद यांनाही ऐकवली पण सगळीकडून त्यांना नकारच मिळाला. अखेर सलीम- जावेद यांनी अमिताभ बच्चन यांना आपल्या चित्रपटात कास्ट केलं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांचा कोणताच चित्रपट म्हणावा तेवढा हिट ठरला नव्हता. बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्कं करण्यासाठी अमिताभ बच्चन यांची धडपड चालूच होती आणि अशात सलीम- जावेद जोडीने लिहिलेला ‘जंजीर’ अमिताभ बच्चन यांच्या करिअरमधला पहिला सुपर-डुपर हिट चित्रपट ठरला. या चित्रपटामुळे अमिताभ बच्चन रातोरात सुपरस्टार झाले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salim khan birthday when famous actor rajkumar insulted salman khan father mrj
First published on: 24-11-2022 at 13:12 IST