Why Salim Khan Family Never Ate Beef: सलमान खान व त्याचे कुटुंबीय नेहमीच हिंदू सण उत्साहाने आणि भक्तीने साजरे करतात. दरवर्षीप्रमाणेच यंदाही सलमानच्या घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली. सलमानचे आई-वडील, भाऊ-बहीण सर्वजण गणरायाची मनोभावे पूजा करतात. सलमानचे वडील, ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान यांनी एका मुलाखतीत मुस्लीम असूनही गोमांस न खाण्यामागचं कारण सांगितलं आहे.
फ्री प्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान म्हणाले, “इंदूरला राहायचो तेव्हापासून ते आतापर्यंत मुस्लीम असूनही आम्ही कधीही गोमांस (बीफ) खाल्लं नाही. बहुतांशी मुस्लीम गोमांस खातात कारण ते सर्वात स्वस्त आहे. काही जण पाळीव श्वानांना खाऊ घालण्यासाठी देखील गोमांस विकत घेतात. पण मोहम्मद पैगंबर यांनी अशी शिकवण दिलीये की गाईचे दूध हे आईच्या दुधासाठी पर्यायी आहे आणि ते मुफीद म्हणजेच खूप आरोग्यदायी आहे. गायींची कत्तल करू नये आणि गोमांस निषिद्ध आहे, असं त्यांनी म्हटलंय.”
प्रत्येक धर्म चांगला आहे
पुढे सलीम खान म्हणाले, “प्रेषित मोहम्मद यांनी प्रत्येक धर्मातील चांगल्या गोष्टी स्वीकारल्या. उदाहरणार्थ, हलाल मांस खाणं हे त्यांनी यहुद्यांकडून स्वीकारलं होतं, ते त्याला कोशेर म्हणतात. त्यांनी म्हटलंय की प्रत्येक धर्म चांगला आहे आणि प्रत्येक धर्म आपल्याप्रमाणेच एका सर्वोच्च शक्तीवर विश्वास ठेवतो.”
आंतरधर्मीय लग्नाला कुटुंबाने विरोध केला नाही – सलीम खान
सलीम खान म्हणाले की ते हिंदू लोकांमध्ये लहानाचे मोठे झाले. जेव्हा त्यांनी सुशीला चरक यांच्याशी आंतरधर्मीय लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कुटुंबाने आक्षेप घेतला नव्हता, असंही सलीम यांनी सांगितलं.
सलीम खान यांनी १९६४ मध्ये सलमा खानशी लग्न केलं. ते दोघेही सलमान खान, अरबाज खान, सोहेल खान, अलविरा अग्निहोत्री आणि अर्पिता खान यांचे पालक आहेत. सलीम खान यांनी १९८१ मध्ये त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री हेलनशी दुसरं लग्न केलं. या लग्नापासून त्यांना मूलबाळ नाही.
सलीम खान हे बॉलीवूडमधील ज्येष्ठ पटकथा लेखक आहेत. त्यांनी व जावेद अख्तर यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. ‘शोले’, ‘दीवार’ आणि ‘जंजीर’ सारख्या चित्रपटांचे ते लेखक आहेत.