Salim Merchant reacts on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरायला गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. २६ जणांची त्यांनी गोळ्या मारून हत्या केली, तर तब्बल २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा जण महाराष्ट्रातील आहेत. या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडून जाण्यास सांगितलं आहे. याचदरम्यान, गायक सलीम मर्चंटने या हल्ल्याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सलीमने आपल्याला मुस्लीम असल्याची लाज वाटतेय, असं वक्तव्य केलं आहे. तसेच इस्लाम लोकांना मारणं शिकवत नाही. धर्माच्या बाबतीत जबरदस्ती नाही, असं कुराणमध्ये लिहिलंय, असंही सलीम म्हणाला. त्याने काश्मीरमधील लोकांच्या अडचणींवरही भाष्य केलं आहे.

सलीम मर्चंट काय म्हणाला?

“पहलगाममध्ये ज्या निष्पाप लोकांची हत्या करण्यात आली, ती यासाठी झाली की ते हिंदू आहेत, मुस्लीम नाहीत. त्यांना मारणारे मुस्लीम आहेत का? नाही. ते दहशतवादी आहेत. कारण इस्लाम हे शिकवत नाही. कुराणमध्ये म्हटलंय की धर्माच्या बाबतीत कोणतीही जबरदस्ती नाही. मला मुस्लीम म्हणून लाज वाटतेय की मला हा दिवस पाहावा लागतोय. माझ्या निष्पाप हिंदू बहीण-भावांना इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं, तेही फक्त यासाठी की ते हिंदू आहेत. कधी संपेल हे सगळं?” असा प्रश्न सलीमने उपस्थित केला.

“काश्मीरमधील लोक जे मागील २-३ वर्षांपासून थोडं नीट जगत होते, त्यांच्या आयुष्यात पुन्हा त्याच अडचणी. खरंच कळत नाहीये की मी माझा राग आणि दुःख कसं व्यक्त करू. ज्या निर्दोष लोकांनी आपले जीव गमावले, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो. ईश्वर त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शक्ती आणि समृद्धी देवो. ओम शांती,” असं गायक सलीम मर्चंट व्हिडीओमध्ये म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Salim Merchant (@salimmerchant)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शाहरुख खान, सलमान खान, प्रियांका चोप्रा, रश्मिका मंदाना, विकी कौशल, परिणीती चोप्रा यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी या दहशतवादी हल्ल्याबद्दल संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानी कलाकार फवाद खान, माहिरा खान, हानिया आमिर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. कुठेही घडणारी शोकांतिका ही शोकांतिकाच असते, असं हानियाने पोस्टमध्ये लिहिलंय.