बॉलिवूडचा भाईजान सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. याबरोबरच सलमानचा मेहुणा आयुष शर्माच्या आगामी चित्रपटाचा टीझरही प्रदर्शित झाला. आता मात्र आयुष शर्मा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आयुष शर्माचा आगामी चित्रपट ‘रुस्लान’चा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. ‘रुसलान’मध्ये आयुषची जबरदस्त अॅक्शन पुन्हा एकदा पाहायला मिळाली.

मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट अडचणीत सापडला आहे. खरे तर ‘रुसलान’चे निर्माते केके राधामोहन आणि आयुष शर्मा यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यांच्या चित्रपटाच्या शीर्षकावरून हा वाद सुरू आहे. निर्मात्यांना ही नोटिस अभिनेता राजवीर शर्माचे वकील रुद्र विक्रम सिंह यांनी पाठवली आहे त्यांनी चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला आहे.

आणखी वाचा : ‘पठाण’बरोबर ‘गांधी गोडसे’ हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय अयोग्य; खुद्द राजकुमार संतोषी यांनी कबूल केली चूक

या चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्याचे नाव बदलायला हवे आणि कोणत्याही संवादात किंवा कथेत या नावाचा उल्लेख केल्यास निर्मात्यांनी कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असे वकिलांनी यात स्पष्ट केले आहे. २००९ साली याच शीर्षकासह एक चित्रपट प्रदर्शित झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. अभिनेता राजवीर शर्मा आणि ज्येष्ठ अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची मुलगी मेघा चॅटर्जी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. आता हा चित्रपट लवकरच ओटीटीवरही प्रदर्शित होणार होता. त्यामुळे एकंदरीत याच शीर्षकामुळे ही नोटीस पाठवण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे.

जर तनिर्मात्यांनी ‘रुस्लान’ हा शब्द वापरला असेल तर तो कथा आणि संवादातून काढून टाकण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. अलीकडेच २१ एप्रिल रोजी ‘रुस्लान’चा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन कात्यायन शिवपुरी यांनी केले आहे. या चित्रपटात आयुष शर्मा व्यतिरिक्त प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता जगपती बाबूदेखील दिसणार आहे.