Salman Khan Says He Is Not Responsible For Breaking Anyones Career : सध्या ‘बिग बॉस १९’ची चर्चा सुरू आहे. नुकतंच या पर्वाचा दुसरा ‘वीकेंड का वार’ पार पडला. यादरम्यान ‘बिग बॉस’च्या मंचावर सलमान खानने लोक त्याच्याबद्दल तो इतरांचे करिअर संपवतो असं खूप काही बोलत असतात, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

‘बिग बॉस १९’च्या मंचावर ‘वीकेंड का वार’दरम्यान ‘बिग बॉस’च्या घरात अभिनेत्री शहनाज गिलचा भाऊ शहबाझ बदेशाची वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री झाली आहे. अशातच त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याची बहीण व ‘बिग बॉस’ सीझन १३ची स्पर्धक शहनाज गिल उपस्थित होती. त्यावेळी तिने सलमानला “सर त्याला (शहबाझ) काही काम असेल तर द्या. गेल्या ७ वर्षांपासून त्याचं या शोमध्ये येण्याचं स्वप्न होतं”, असं सांगितलेलं. यावेळी ती सलमानला तो लोकांचं करिअर घडवतो असंही म्हणाली.

सलमान खानची प्रतिक्रिया

शहनाजला प्रतिक्रिया देत सलमानने सांगितलं की, तो कोणाचंही करिअर घडवण्यासाठी किंवा संपवण्यासाठी जबाबदार नाहीये. सलमान पुढे म्हणाला, “लोक म्हणतात की किती लोकांना डुबवलं, महत्त्वाचं म्हणजे डुबवणं तर माझ्या हातातच नाही. पण, हल्ली असं खूप म्हटलं जातं की करिअर संपवलं, मी कोणाचं करिअर संपवलं? जर संपवायचंच असेल तर मी माझं करिअर संपवेन.”

सलमान पुढे म्हणाला, “करिअर घडवणं देवाच्या हातात असतं… लोकांनी माझ्यावर मी इतरांचे करिअर संपवले असे आरोप केले. एकवेळ मी माझं करिअर संपवेन. लोक खूप चांगले आहेत आणि देव त्यांच्याहूनही जास्त चांगला आहे.”

नुकतंच सलमान खानच्या ‘दबंग’ या सुपरहिट चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिनव कश्यपने सलमान खानबद्दल गंभीर विधान केलं आहे. ‘स्क्रीन’शी संवाद साधताना त्याने सलमानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत त्याच्या व खान कुटुंबावर टीका केली आहे.

‘दबंग’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाची सलमान खान व त्याच्या कुटुंबावर टीका

अभिनव कश्यप सलमान खानबद्दल म्हणाला, “गेल्या २५ वर्षांपासून त्याला अभिनयातही रस नाहीये, तो काम करून स्वत:वर उपकार करतो. त्याचा सेलिब्रिटीकडे असलेल्या पॉवरकडे जास्त कल आहे, पण त्याला अभिनयात रस नाही. तो गुंड आहे. मला याबद्दल दबंग करण्यापूर्वी माहीत नव्हतं, तो बेशिस्त आहे, घाणेरडा माणूस आहे.”

खान कुटुंबाबद्दल अभिनव कश्यप पुढे म्हणाला, “तो अशा कुटुंबातून आहे, जे गेल्या ५० वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे. ते सूडबुद्धीने वागणारे लोक आहेत. तुम्ही जर त्यांच्या मताशी सहमत झाला नाहीत तर ते तुमच्या मागे लागतात, त्यांना लोकांना त्यांच्या ताब्यात ठेवायचं असतं.”