Bollywood Actor Salman Khan at Sitaare Zameen Par’s Screening : आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी सलमान खानही उपस्थित होता. आमिर खानचे कुटुंबीयसुद्धा उपस्थित होते. आमिरचा मोठा मुलगा जुनैद खानही वडिलांच्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला उपस्थित होता. परंतु, सलमान खानभोवती असलेल्या गर्दीमध्ये अभिनेत्याच्या बॉडीगार्डने त्याला धक्का दिल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
Mohdxadnan या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जुनैद व सलमान एकत्र चालत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी सलमानच्या आजूबाजूला प्रचंड गर्दी होती. त्याच्या चाहत्यांनी मध्ये येऊ नये याकरिता त्याचे बॉडीगार्ड त्याच्याबरोबर चालताना दिसत होते. परंतु, यावेळी जुनैद खान सलमानबरोबर चालत असताना सलमानच्या एका बॉडीगार्डने जुनैदला धक्का दिल्याचं पाहायला मिळालं. सलमानच्या बॉडीगार्डने जुनैद हा सलमानच्या एका चाहत्यांपैकीच आहे असं समजून त्याला धक्का दिल्याचं म्हटलं जात आहे.
सलमानसह चालत असताना त्याच्या बॉडीगार्डने धक्का दिल्यानंतर जुनैद खानने केलेल्या कृतीने खरंतर लक्ष वेधून घेतलं. आपल्याला कोणीतरी धक्का दिल्यानंतरही त्याने त्या बॉडीगार्डला न रागवता आधी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचं लक्ष नसल्याने शेवटी जुनैदने त्या बॉडीगार्डशी हात मिळवला आणि त्याच्याकडे बघून स्मित हास्य केलं.
सलमान खानच्या सुरक्षेसाठी नेहमीच त्याच्याबरोबर बॉडीगार्ड असतात. सलमान खानला गेल्या काही दिवसांपासून जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. तर त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर १४ एप्रिल २०२४ रोजी गोळीबार झाला होता, त्यामुळे सलमान खानसह नेहमीच बॉडीगार्ड असतात.
दरम्यान, जुनैदबद्दल बोलायचं झालं तर जुनैदने २०२४ मध्ये आलेल्या ‘महाराज’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री शर्वरी वाघ झळकली होती. चित्रपटातील दोघांची जोडी त्यावेळी खूप प्रसिद्ध झाली होती. यानंतर जुनैद ‘लव्हयापा’ या चित्रपटात झळकला होता. यामध्ये त्याच्यासह खूशी कपूर पाहायला मिळालेली. यानंतर आता जुनैद दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीसह ‘एक दिन’ या चित्रपटातून झळकणार आहे.