Sanjay Dutt’s daughter Trishala slams parents: अभिनेता संजय दत्त हा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेता जितका त्याच्या चित्रपटातील भूमिकांमुळे चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या खासगी आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो.
आता संजय दत्त त्याच्या मुलीमुळे चर्चेत आला आहे. संजय दत्त व त्याची पहिली पत्नी रिचा शर्मा यांची मुलगी त्रिशालाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमध्ये तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्रिशालाची ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे, कोणाला उद्देशून तिने लिहिले आहे, असे अनेक प्रश्नही निर्माण झाले आहेत.
“दुर्लक्ष करणारे आणि अवहेलना करणारे लोक…”
त्रिशालाने लिहिले, “ज्यांच्याशी तुमचे रक्ताचे नाते आहे, असे सर्वच लोक तुमच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान मिळवण्याच्या पात्रतेचे नसतात. अनेकदा वाईट वागणूक देणारे, आपली अवहेलना करणारे आणि आपल्याकडे दुर्लक्ष करणारे लोक कुटुंबात असतात. पण, तुम्हाला शांततेत आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. तुम्हाला हवे असल्यास नात्यांमध्ये अंतर ठेवण्याचा, संपर्कात राहण्याचा किंवा न राहण्याचा हक्क आहे.”
“तुम्हाला कुटुंबाची प्रतिमा जपण्यापेक्षा तुमचे मानसिक आरोग्य निवडण्याचा अधिकार आहे. कारण- ‘कुटुंबा’ला गैरवर्तन करण्याचा, तुमचे मत परिवर्तन करण्याचा किंवा तुमच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण करण्याची परवानगी नाही. जरी त्यांनी तुम्हाला वाढवले असले तरी तुम्हाला वारंवार दुखावणाऱ्यांना तुमच्या आयुष्यात स्थान देण्याची गरज नाही.”
पुढे त्रिशालाने असेही लिहिले, “जेव्हा पालकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांना काय वाटते, यापेक्षा आपल्या कुटुंबाची प्रतिमा जगासमोर कशी आहे, याची काळजी जास्त वाटते, तेव्हा ती एक गंभीर समस्या असते.”

ही पोस्ट शेअर करताना त्रिशालाने तिने कोणासाठी किंवा कोणाबद्दल लिहिले, याबद्दल कोणाताही खुलासा केला नाही. तिने असे का लिहिले, याबद्दलही तिने काही खुलासा केलेला नाही. काही दिवसांपूर्वीच त्रिशालाने संजय दत्तच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करीत त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
काही वर्षांपूर्वी संजय दत्तने उघडपणे सांगितले होते की, त्रिशालाला चित्रपटांमध्ये करिअर करण्यास पाठिंबा देणार नाही. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेता म्हणालेला, “मी माझ्या मुलीला चित्रपटांमध्ये काम करण्यास अजिबात प्रोत्साहन देत नाही. दत्त कुटुंबात असे कधीच घडले नाही. माझ्या बहिणी किंवा माझी भाचीदेखील चित्रपटांमध्ये काम करू शकली असती; पण माझ्या वडिलांनी आम्हाला तशा पद्धतीने वाढवलेले नाही. माझी मुलगी अभिनय क्षेत्रात काम करण्यास उत्सुक आहे; पण तिने फॉरेन्सिक सायन्सचा अभ्यास केला आहे. ती या क्षेत्रात उत्तम करिअर करू शकते.”
त्यावर त्रिशालाने असे म्हटले होते की, शेवटी निर्णय माझा आहे. मी माझ्यासाठी जे सर्वोत्तम वाटते आणि ज्या गोष्टींमधून मला आनंद मिळतो, त्या करण्यावर मी भर देईन.
संजय दत्तच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो लवकरच ‘बागी ४’, ‘वेलकम टू द जंगल’, या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.