बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने ९ मार्चला निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर मनोरंजनविश्वात शोककळा पसरली आहे. त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती.

सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी हरियाणामध्ये झाला. १९८३ मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी अनेक नाटकांमध्येही काम केलं. ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ यासारख्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’सह या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या भूमिका गाजल्या.

हेही वाचा>> “१० वर्षांच्या मुलीसाठी सतीश कौशिक यांना खूप वर्ष जगायचं होतं, कारण…”, अभिनेत्याच्या निधनानंतर मित्राचा खुलासा

हेही पाहा>> Satish Kaushik Passed Away: पत्नी आणि १० वर्षांच्या मुलीसाठी किती संपत्ती सोडून गेले सतीश कौशिक?

सतीश कौशिक यांनी १९८५ मध्ये शशी कौशिक यांच्याशी विवाह केला. १९९६ मध्ये दोन वर्षाच्या मुलाला गमावल्यानंतर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर ५६व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्यांची मुलगी वंशिका आता १० वर्षांची आहे. ५६ व्या वर्षी वडील झालेले कौशिक आनंदी होते. परंतु, पन्नाशीत वडील झाल्यामुळे त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.

हेही वाचा>> सतीश कौशिक यांनी गरोदर नीना गुप्तांना लग्नाची मागणी घातल्यानंतर ‘अशी’ होती त्यांच्या पत्नीची प्रतिक्रिया, स्वतःच केलेला खुलासा

२०१२ साली जन्म घेतलेली वंशिका तीन वर्षांची झाल्यानंतर कौशिक यांनी एका मुलाखतीत याबाबत भाष्य केलं होतं. “या वयात मुलगी झाल्यामुळे मला तरूण वाटतं. परंतु, पन्नाशीत वडील होणं, खूप कठीण आहे. माझी मुलगी आता तीन वर्षांची आहे. तिच्याबरोबर खेळण्यासाठी ती मला आग्रह करते. बाबा मला पकडा, असं ती म्हणत असते. पण मी या वयात तिच्यामागे पळू शकत नाही आणि हे मी तिला सांगूही शकत नाही. मी एक अभिनेता असल्यामुळे धावण्याचा फक्त अभिनय करतो”, असं ते म्हणाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी तिला निराश करू शकत नाही. ती खूप छान आहे. आताच ती शाळेत जायला लागली आहे. तिच्यामुळे मी घरातही लक्ष द्यायला लागलो आहे. मुलाला गमावल्यानंतर मी कामात स्वत:ला व्यग्र करुन घेतलं होतं. परंतु, आता मी फॅमिली मॅन झालो आहे”, असंही ते म्हणाले होते.