अभिनेता सतीश शाह दीर्घकाळापासून मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे. या अभिनेत्याने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. ‘जाने भी दो यारों’पासून, ‘कभी हां कभी ना’, ‘डीडीएलजे’, ‘हम आपके है कौन’ ते अगदी ‘मैं हूं ना’ पर्यंत अनेक वेगवेगळ्या आणि मोठ्या बॅनरच्या चित्रपटात काम केले आहे. सतीश शाह यांनी चित्रपटाबरोबरच टेलिव्हिजन क्षेत्रातही मोठं योगदान दिलं आहे.

आपल्या खास विनोदी शैलीसाठी आणि टायमिंगसाठी सतीश शाह प्रसिद्ध आहेत, पण एकंदरच विनोदी भूमिका साकारणाऱ्या नटाकडे लोक अतिशय वेगळ्याच नजरेतून बघतात याबद्दल नुकतंच सतीश यांनी भाष्य केलं आहे. आपल्या बाबतीत घडलेला अनुभवही त्यांनी शेअर केला आहे. ‘सीएनएन न्यूज १८’शी संवाद साधताना सतीश शाह यांनी त्यांच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगितला.

आणखी वाचा : राजकुमार राव व दुल्कर सलमान झळकणार एकाच वेब सीरिजमध्ये; ‘या’ दिवशी येणार ‘गन्स अँड गुलाब्स’चा ट्रेलर

भारतीय प्रेक्षक कलाकार आणि ती स्वतंत्र व्यक्ती यात फरक करण्यात चुकतात असं सतीश शाह यांचं म्हणणं आहे. एकदा सतीश शाह हे त्यांच्याच एका चाहत्याला मारणार होते. याबद्दल सांगताना ते म्हणाले, “माझी पत्नी एकदा आजारी होती, ती अक्षरशः मरणाचा दारात उभी होती एवढी वाईट परिस्थिती होती. मी त्यावेळी रुग्णालयातच होतो, आमच्या लग्नाला नुकतेच तीन महीने पूर्ण झाले होते. मी त्यावेळी बाहेर बसलो होतो, डोक्यात वेगळे विचार आणि चिंता होती. अशातच एक माणूस माझ्याजवळ आला अन् मला म्हणाला की काय तुम्ही एवढे गंभीर चेहेरा घेऊन बसलायत, एखादा विनोद सांगा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी त्या माणसाला एक बुक्का मारावा अशी इच्छा सतीश यांच्या मनात होती. याबद्दल ते म्हणाले, “त्यावेळी मी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवलं आणि तिथून निघून गेलो, पण ही गोष्ट कायम आमच्या पाचवीला पूजलेली असतेच.” सतीश शाह यांनी ‘सारभाई वि. साराभाई’ आणि ‘ये जो है जिंदगी’सारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्येही काम केलं आहे.