Poonam Dhillon on Rajesh Khanna: राजेश खन्ना यांचे बॉलीवूडमधील योगदान महत्त्वाचे आहे. बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार म्हणूनही अनेकदा त्यांचे नाव घेतले जाते. त्यांच्या यश आणि अपयशाचे अनेक किस्से त्यांचे सहकलाकार अनेकदा सांगतात. तसेच, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवदेखील सांगतात.
“राजेश खन्ना जेव्हा यशाच्या शिखरावर होते…”
आता अभिनेत्री पूनम ढिल्लों यांनी ‘एएनआय'(ANI)ला दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्ना यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासून त्या राजेश खन्नांना ओळखत होत्या.
त्या म्हणाल्या, “राजेश खन्ना जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तो काळ मी पाहिला नाही. कारण- त्यावेळी मी चित्रपटांत काम करीत नव्हते. पण, मी जेव्हा आठवीत होते, तेव्हा मी त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी गेले होते. चंदिगडमध्ये बी. आर चोप्रा यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. राजेश खन्ना चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. मला वाटते की, विद्या सिन्हा त्यांच्या सहकलाकार होत्या. त्यावेळी मी त्यांना पाहिले होते.”
पुढे त्या म्हणाल्या, “अभिनय क्षेत्रात आल्यानंतर पुन्हा एकदा राजेश खन्ना यांच्याबरोबर भेट झाली. मी माझ्या तिसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करीत होते. त्यावेळी मला अनेकांनी इशारा दिला होता की, त्यांच्याबरोबर काम करणे कठीण आहे. पण, प्रामाणिकपणे सांगायचं तर मला असा अनुभव कधीच आला नाही. ते माझ्याशी कधीही वाईट वागले नाहीत. ते माझ्याशी रागानेही बोलले नाहीत.”
“राजेश खन्ना यांनी माझ्या पहिल्या चित्रपटात खूप मदत केली होती. ‘रेड रोज’ हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट होता. एक नवीन कलाकार म्हणून या चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक होती. त्यामुळे मी घाबरले होते. दिग्दर्शक भारती राजा यांना हिंदी येत नव्हते. ते त्यांच्या सहायकाशी तमीळमध्ये बोलत असत. त्यांना माझा लूक, तसेच माझा अभिनय आवडला की नाही, याबद्दल मला कळत नव्हते. या सगळ्यात मला राजेश खन्ना यांनी मला खूप मदत केली आणि आश्वस्तदेखील केले.
पूनम ढिल्लों पुढे म्हणाल्या, “मी असे म्हणणार नाही की, आम्ही मित्र होतो. ते माझ्यापेक्षा खूप मोठे होते; पण त्यांनी मला लहानपणापासून पाहिले होते. त्यामुळे ते मला लहान मुलासारखे वागवत. त्यांच्यामुळे सेटवर मला आश्वस्त वाटायचे. ते मला संरक्षकासारखे वाटत”, असे म्हणत राजेश खन्ना यांच्याबद्दलचा आदर पूनम ढिल्लों यांनी व्यक्त केला.