बॉलीवूडमध्ये असे काही चित्रपट आहेत, ज्या चित्रपटांमुळे मोठ्या प्रमाणात विवाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. शबाना आझमी (Shabana Azmi) यांची मुख्य भूमिका असलेला ‘फायर’ हा अशाच चित्रपटांपैकी एक आहे. १९९८ साली प्रदर्शित झालेला ‘फायर’ चित्रपट दीपा मेहता यांनी दिग्दर्शित केला होता. शबाना आझमी यांच्याबरोबरच अभिनेत्री नंदिता दास मुख्य भूमिकेत होत्या. समलैंगिक व्यक्तींमधील प्रेम अशा आशयाची कथा असलेल्या या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोधाचा, टीकेचा सामना करावा लागला होता. या चित्रपटाने भारतातील लेस्बियन आणि गे यांच्या हक्कांबद्दल चर्चा सुरू केली.
‘फायर’ हा चित्रपट भारतीय संस्कृतीच्या विरुद्ध आहे. तसेच अश्लील असल्याचे अनेक राजकीय पक्षांनी म्हटले होते. हा चित्रपट महिलांना बिघडवू शकतो, असेही अनेकांनी म्हटले होते. आता शबाना आझमींनी एका मुलाखतीत नंदिता दास यांच्याबरोबरच्या इंटिमेट सीनच्या शूटिंगचे काही किस्से सांगितले आहेत.
काय म्हणाल्या शबाना आझमी?
शबाना आझमी यांनी नुकतीच ‘रेडिओ नशा ऑफिशिअल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत ‘फायर’ या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला, याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, “जेव्हा मी स्क्रीप्ट ऐकली त्यावेळीच मला ती खूप आवडली होती. मला याची पूर्णपणे जाणीव होती की हे असे काहीतरी आहे, ज्याबद्दल भारतात खुलेपणाने बोलले जात नाही. त्यावेळी माझ्या मनात मी हे करू शकते का? या प्रश्नापेक्षा मी हे केले पाहिजे का? असा विचार सतत येत होता. मी फक्त हा विचार करत होते की जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर काय होईल? त्यानंतर मला या गोष्टीची जाणीव झाली की, मी प्रत्येक भारतीयाला एकसारखेच पाहू शकत नाही. सगळे सारखे नाहीत. काही जणांना आवडेल, काहींना आवडणार नाही. काही जण नाराज होतील, पण कमीत कमी या चित्रपटामुळे प्रश्न विचारायला तरी सुरुवात होईल.”
चित्रपट स्वीकारण्याआधी शबाना आझमींनी त्यांचे पती व प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याबरोबर या चित्रपटाबाबत संवाद साधला होता. जावेद अख्तर यांच्याबरोबरचे बोलणे आठवत शबाना आझमींनी म्हटले, “जेव्हा मी त्यांच्याशी चित्रपटाबाबत बोलले त्यावेळी त्यांनी मला विचारले की, तुला ही स्क्रीप्ट आवडली आहे का? मी म्हटले, “हो.” ते म्हणाले की हा चित्रपट कर. त्यांनी मला समजावून सांगितले की, हा चित्रपट विवांदाशिवाय पूर्ण निर्माण होणार नाही याची जाणीव तुला असायला हवी. मात्र, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तू त्याचा बचाव करू शकतेस, असे तुला वाटत असेल तर हा चित्रपट कर.” दीपा यांनी तो चित्रपट तितक्या संवेदनशीलरित्या बनवल्याने मला चित्रपटाचा बचाव करण्याचा आत्मविश्वास आला.”
पुढे चित्रपटातील इंटिमेट सीनच्या शूटिंगचा अनुभव सांगताना शबाना आझमी म्हणाल्या, “मी नंदिताला ओळखत नव्हते. शूटिंगच्या पहिल्याच दिवशी दीपाने आम्हाला प्रेमाच्या सीनचा सराव करायला सांगितले. नंदिता व मी, आम्ही दोघींनी अशा प्रकारचे सीन आधी कधीही केले नव्हते. नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर ठेवले, ते काही रोमँटिक वाटत नव्हते. दीपाने ओरडत म्हटले की, तुला मी तिचे दात घासायला सांगितले होते. ते सीन शूट करणे आमच्या दोघींसाठी कठीण होते. मात्र, सेटवर कॅमेरामन, दीपा व आम्ही दोघी यांच्याशिवाय इतर कोणीही असू नये, याची काळजी दीपाने घेतली. तिने एक सुरक्षित वातावरण तयार केले होते.”
‘फायर’ चित्रपटात काम केल्याबद्दल शबाना आझमींना अभिमान वाटतो. चित्रपटातून हा प्रश्न मांडल्याबद्दल आजही इतक्या वर्षांनंतर अनेक लोक त्यांचे आभार मानत असल्याचे शबाना आझमींनी म्हटले आहे. याआधी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या एका मुलाखतीत, शबाना आझमींनी या चित्रपटाला होकार देताना झोया अख्तरचीदेखील मदत झाल्याचे म्हटले होते.
दरम्यान, शबाना आझमी लवकरच झीनत अमान व अभय देओल यांच्याबरोबर ‘बन टिक्की’ चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.