Shahrukh Khan Did Farah Khan’s Kanyadaan : फराह खान बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शिका आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. फराह अनेकदा तिच्या खासगी व व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रियही असते. अशातच आता फराह खानच्या लग्नातील एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतं.
फराह खानच्या लग्नातील व्हिडीओ व्हायरल होत असून यामध्ये बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान तिचं कन्यादान करताना दिसतोय. महत्त्वाचं म्हणजे फराहने या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत यामागचं कारणही सांगितलं आहे. फराह खान व शाहरुख खान यांनी अनेकदा एकत्र काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये केवळ मैत्रीपूर्वक संबंध नसून ते एकमेकांना कुटुंबीयांप्रमाणेच समजतात. अनेकदा फराह तिच्या यूट्यूब चॅनेलवरील व्लॉगमधून शाहरुखबद्दल बोलताना दिसते. अशातच आता समोर आलेल्या व्हिडीओमधून खरंच हे दोघे एकमेकांना कुटुंबीयांप्रमाणेच समजतात हे पाहायला मिळतं.
Missmaliniने इन्स्टाग्रामवर फराह खानच्या लग्नातील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये फराह खान व तिचा नवरा शिरीश कुंदर पारंपरिक पेहरावात पाहायला मिळत असून त्यांच्याबरोबर तिथे शाहरुख खान व गौरी खानही उपस्थित असल्याचं दिसतं. यावेळी त्यांच्या लग्नातील विधी सुरू असून शाहरुख खान तिचं कन्यादान करत असल्याचं या व्हिडीतून पाहायला मिळतं. यावर फराहने स्वत: “तुम्हाला हे कुठे सापडलं” अशी कमेंटही केली आहे.
…म्हणून शाहरुख खानने केलेलं फराह खानचं कन्यादान
फराह व शिरीश यांच्या लग्नातील या व्हिडीओखाली अनेकांनी कमेंट्स केल्याचं पाहायला मिळतं. यावेळी एका नेटकऱ्याने “हे कन्यादान नाहीये आणि फराहबरोबर त्यावेळी तिची आई आणि भाऊ होता” अशी कमेंट केल्याचं दिसतं. नेटकऱ्याने केलेल्या या कमेंटनंतर फराहने स्वत: कमेंट करत उत्तर दिलं आहे. फराह यावेळी कमेंट करत म्हणाली, “मंगलुरूमध्ये फक्त विवाहित जोडपंच कन्यादान करू शकतात, त्यामुळे उगाच निरर्थक बोलण्यापू्र्वी विचार करा.”

फराह व शिरीष कुंदर यांनी २००४ मध्ये लग्नगाठ बांधलेली. त्यांचं लग्न पारंपरिक पद्धतीने झाल्याचं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतून पाहायला मिळतं. आता या जोडप्याचं दोन मुली व एक मुलगा असं कुटुंब आहे. फराह तिच्या मुलांबद्दल सोशल मीडियावर फार बोलत नाही.
