Faruk Kabir on Shah Rukh Khan: अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. संपूर्ण जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. मात्र, त्याला जे यश मिळाले त्यामागे त्याचे कष्ट, सातत्य आणि कामाप्रती समर्पण आणि प्रमाणिकपणा या गोष्टी आहेत, असे वेळोवेळी ऐकायला मिळते.
स्वत: शाहरुख खानने काही मुलाखतींमध्ये कामाप्रतीच्या समर्पणाबाबत वक्तव्य केले आहे. तसेच त्याच्याबरोबर काम करणारे अनेक कलाकार त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत, तो सहकलाकारांशी कसे वागतो अशा अनेक गोष्टींबाबत बोलताना दिसतात.
शाहरुख खानबद्दल काय म्हणाले फारुख कबीर?
आता दिग्दर्शक फारुक कबीर यांनी ‘फिर भी दिल है हिंदूस्तानी’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची शाहरुख खानची आठवण सांगितली आहे. अझिझ मिर्झा दिग्दर्शित ‘फिर भी दिल है हिंदूस्तानी’ हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान व जुही चावला प्रमुख भूमिकेत दिसले होते. फारुक कबीर यांनी या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते.
‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत फारुक कबीर म्हणाले, “जे कोणी शाहरुख खानबरोबर काम करते, त्या व्यक्तीला लाज वाटते की आपण किती कमी काम करत आहोत, कारण शाहरुख खान खूप मेहनती आहे. तो शरीर आणि मनाने सेटवरच असतो. काम करताना तो दुसरा कोणताही विचार करत नाही. जर कनिष्ठ कलाकार काही गोष्टी बरोबर करत नसतील तर त्या सुधारण्याचा तो स्वत: प्रयत्न करतो. तो इतर कलाकारांना ओरडत नाही, त्यांना अॅटिट्यूड दाखवत नाही, तो सगळ्या गोष्टी खूप प्रेमाने करतो.”
पुढे फारुक कबीर म्हणाले, “इतका मोठा स्टार असूनही तो खूप माणुसकीने वागतो, ही गोष्ट त्याच्याकडून शिकण्यासारखी आहे. ‘आय एम द बेस्ट’ या गाण्याच्या शूटिंगवेळी शाहरुख खान सराव करण्यासाठी सेटवर लवकर पोहोचला. त्या गाण्यात एक स्टेप अशी होती की त्याला गुडघ्यावर सरकावे लागत होते. फरशी गुळगुळीत नसल्याने गुडघ्यावर सरकणे त्याला अवघड जात होते, फरशी पुसणे गरजेचे होते.”
“त्याने जवळच्या प्रॉडक्शन डिपार्टमेंटमधून एक पाण्याची बादली आणि मॉप आणला. तेव्हा सेटवर फक्त तीन-चार लोक होते. लाईटमनदेखील गाढ झोपले होते. शाहरुखला फरशी पुसताना पाहून मी त्याच्याकडे धावत गेलो. दुसरे एक मॉप घेतला आणि शाहरुखबरोबर फरशी पुसायला सुरुवात केली. त्याचे जेवण लवकर झाल्याने तो सराव करण्यासाठी सेटवर लवकर आला होता. क्रूमधील इतर लोक जेवण करत होते. पण, त्यामुळे तो क्रू येण्याची वाट त्याने पाहिली नाही. मग त्याने सराव केला आणि क्रू आल्यावर शूटसाठी तयार झाला.”
दरम्यान, शाहरुख लवकरच ‘द किंग’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याची लेक सुहाना खान व अभिनेता अभिषेक बच्चनदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.