बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानप्रमाणे त्याचा मुलगा आर्यन खानही सतत चर्चेत असतो. आर्यनचा वेगळा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावर आर्यन सक्रिय आहे. त्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. दरम्यान, आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरील आर्यनची कृती बघून अनेक जण त्याचं कौतुक करीत आहेत.
हेही वाचा- “आम्ही दोघे वेगळे झालोय…” शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या ‘त्या’ ट्वीटमुळे चर्चांना उधाण
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आर्यन खान त्याच्या कारमध्ये बसलेला दिसत आहे. आर्यनला कारमध्ये बसलेला बघून काही गरीब महिला त्याच्या कारभोवती गोळा झाल्या असून, त्या महिला आर्यन खानकडे पैसे मागताना दिसून येत आहेत. आर्यनही उदार मनाने त्यांना पैसे देत आहे. काही दिवसांपूर्वी शाहरुख खानची मुलगी सुहानाचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. एक गरीब महिला सुहानाकडे पैसे मागताना दिसत होती आणि सुहानानं तिला एक हजार रुपये दिले होते.
आर्यनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करीत आर्यनच्या कृतीचं कौतुक केलं आहे. या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरने लिहिलंय, “गरिबांना मदत करणं ही त्यांची परंपरा आहे. त्याची बहीण सुहाना खाननंही असंच केलं होतं.” तर आणखी एकानं कमेंट करीत लिहिलंय, “जर वडील शाहरुख खान असतील, तर मुलगा नक्कीच असा असेल.”
आर्यनच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर काही दिवसांपूर्वीच आर्यननं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं आहे. आर्यननं एक जाहिरात दिग्दर्शित केली आहे. या जाहिरातीत शाहरुख खाननं अभिनय केला आहे. तसेच आर्यन शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज’ कंपनीमध्ये काम करणाऱ्या लेखकांबरोबर एका स्क्रिप्टचं लिखाण करीत असल्याची बातमी समोर आली होती. परदेशातून आर्यननं फिल्म मेकिंगचं प्रशिक्षण घेतलं आहे. अभिनयापेक्षा आर्यनला दिग्दर्शन आणि लेखनात जास्त रस असल्याचं दिसून आलं आहे.