Kajol recalls her first meeting with Shah Rukh Khan : काजोल व शाहरुख खान ही बॉलीवूडमधील ९० च्या काळातील हिट जोडी म्हणून ओळखली जायची. त्यांनी एकत्र काम केलेले बहुतांश चित्रपट हिट ठरले. त्यामुळे त्या काळी ही जोडी प्रेक्षकांची आवडती होती; तर काहींना हे दोघे खऱ्या आयुष्यामध्ये एकमेकांचे जोडीदार आहेत, असंही वाटायचं. काजोल व शाहरुख एकमेकांचे चांगले मित्र-मैत्रीण आहेत. काजोलनं नुकताच शाहरुख खानबरोबरच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

काजोल व शाहरुख यांनी ‘बाजीगर’ या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. १९९२ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. काजोलनं तिच्या आगामी ‘माँ’ चित्रपटाच्या निमित्तानं ‘रेडिओ नशा’सह संवाद साधताना याबद्दल सांगितलं आहे. यावेळी काजोल म्हणाली, ‘बाजीगर’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ३१ डिसेंबरच्या निमित्तानं पार्टी होती. सगळे पार्टी एन्जॉय करीत होते; पण ती फक्त एकटीच रात्रभर झोपली होती. ती म्हणाली, “त्यावेळी मी १८ वर्षांचीसुद्धा नव्हते. तेव्हा मी माझ्या अभ्यासामध्ये व्यग्र असायचे. त्यामुळे ३१ डिसेंबर असतानाही मी पार्टी वगैरे केली नाही. आणि शाहरुख खानला १ जानेवारीला वर्षाच्या पहिल्या दिवशी काम करायला आवडतं. त्यामुळे पार्टी केल्यानंतरही दुसऱ्या दिवशी सेटवर सगळे पुन्हा काम करण्यासाठी आले होते”.

शाहरुखबद्दल काजोल पुढे म्हणाली, “१ जानेवारीला शूटिंग सुरू झाल्यानंतर सीनपूर्वी मी सेटवर गप्पा मारत बसले होते. मला शांत बसणं जमत नाही. विशेषकरून जेव्हा आजूबाजूला इतकी माणसं असतात. मी कॅमेरामॅन, मेकअप आर्टिस्ट यांच्याशी बोलत होते. माझा आवाज इतका मोठा होता की, माईक नसतानाही मी जे बोलत होते, ते सर्वांना ऐकू जात होतं; पण शाहरुख खान मात्र स्क्रिप्ट पाठ करत एकटाच बसला होता. तेव्हा मी म्हटलं काय खडूस आहे हा”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काजोल पुढे म्हणाली, “शाहरुखशी बोलण्यासाठी मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याला विचारलं की, तू काहीच का बोलत नाहीयेस. नेहमी असाच खडूस असतोस का? पण तो म्हणाला, तू जरा शांत बसशील का, कोणीतरी प्लीज हिला गप्प करा. त्याचं हे बोलणं ऐकून मला वाटलं की, हा किती खडूस आहे. कारण- मी त्याच्याशी फक्त बोलण्याचा प्रयत्न केला होता; पण नंतर आमच्यामध्ये खूप छान मैत्री झाली आणि आता त्याला यातलं काही आठवतही नसेल”.