71st National Film Awards SRK Wins First National Award : बॉलीवूडचा ‘किंग’ शाहरुख खानने १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दीवाना’ सिनेमातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. सिनेमाचं स्वप्न उराशी बाळगून आणि गौरीच्या प्रेमापोटी शाहरुख दिल्ली सोडून मुंबईत आला आणि हळुहळू बॉलीवूडचा बादशहा झाला. मात्र, गेल्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीत किंग खानला एकही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता.
मात्र, आता ३३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शाहरुखची ही इच्छा पूर्ण होणार आहे. अभिनेत्याला ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘जवान’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. शाहरुखचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. विजेत्यांची घोषणा झाल्यावर शाहरुखने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हा पुरस्कार किंग खानने त्याच्या तमाम चाहत्यांना समर्पित केला आहे.
शाहरुख म्हणतो, “नमस्कार, तुम्हा सर्वांना कळवण्यास आनंद होतोय की, मला यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा क्षण आयुष्यभरासाठी माझ्या आठवणीत राहणार आहे. केंद्र सरकार व संपूर्ण जुरी मेंबर्सचे मी मनापासून आभार मानतो. ज्या लोकांनी मला या पुरस्कारयोग्य समजलं त्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार. २०२३ मध्ये माझे जे सिनेमा प्रदर्शित झाले, त्या सगळ्या दिग्दर्शकांचे, लेखकांचे खूप खूप आभार…थँक्यू राजू सर, थँक्यू Sid तसेच अॅटली सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार. त्यांनीच मला ‘जवान’मध्ये काम करण्याची संधी दिली. अॅटली सर हा पुरस्कार तुमच्यासाठी…तुम्ही म्हणता ना अगदी तसंच Massss…”
किंग खान पुढे सांगतो, “मी माझ्या टीमचे सुद्धा मनापासून आभार मानतो. टीममधले सगळेजण कायमच माझी खूप काळजी घेतात, नेहमी माझ्यावर लक्ष ठेवून असतात. याशिवाय मी पडद्यावर अजून चांगला कसा दिसेन याचीही काळजी घेतात. तुमच्या प्रेमाशिवाय हा पुरस्कार जिंकणं केवळ अशक्य होतं…थँक्यू!”
“माझी पत्नी आणि माझ्या तिन्ही मुलांनी गेल्या काही वर्षांत मला कायम पाठिंबा दिला. त्यांनी मला इतकं प्रेम दिलंय की, आता माझ्या घरात सगळ्यात लहान मूल जर कोणी असेल तर ते मी आहे. माझ्या कुटुंबीयांना माझं सिनेमावर असलेलं प्रेम माहितीये…ते नेहमी मला पाठिंबा देतात आणि माझ्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी मला वेळ देतात. राष्ट्रीय पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे…मी जे काम करतोय, ते प्रेक्षक पाहत आहेत याची जाणीव यामुळे होते. आपण यापुढेही असंच काम केलं पाहिजे अशी प्रेरणा मिळते. अभिनय करणं हे माझं काम नसून ती माझी जबाबदारी आहे…पडद्यावर माझ्या सगळ्या चाहत्यांना वास्तविक अनुभव देण्याची जबाबदारी…तुम्हा सगळ्यांचं प्रेम असंच कायम राहूदेत…हा पुरस्कार तुम्हा सर्वांचा आहे. सध्या माझ्या हाताला दुखापत झालीये पण, काळजी करू नका मी लवकरच रुपेरी पडद्यावर पुन्हा येईन Ready??” असं शाहरुखने त्याच्या चाहत्यांना सांगितलं आहे.
दरम्यान, शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेला ‘जवान’ सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकप्रिय दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीने केलं होतं. यामध्ये शाहरुखसह नयनताराने स्क्रीन शेअर केली होती.