Dharmendra Health Update: दिग्गज अभिनेते धर्मेंद्र ३१ ऑक्टोबरपासून रुग्णालयात आहेत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात जवळपास १२ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वयाशी संबंधित समस्यांमुळे ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडली असून ते व्हेंटिलेटरवर आहेत, अशी बातम्या सोमवारी आल्या. त्यानंतर इंडस्ट्रीतील अनेक कलाकार त्यांच्या भेटीसाठी जात आहेत.

शाहरुख खान व आर्यन खान यांनी गुरुवारी रात्री उशीरा रुग्णालयात धर्मेंद्र यांची भेट घेतली. त्याचबरोबर अमीषा पटेल, गोविंदा, तान्या देओल व बॉबी देओल धर्मेंद्र यांना भेटायला रुग्णालयात गेले होते. सलमान खान व सनी देओल, हेमा मालिनीही गुरुवारी ब्रीच कँडीमध्ये होते.

धर्मेंद्र यांची प्रकृती ठिक असून ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ते व्हेंटिलेटरवर नाहीत, असं सनी देओलच्या टीमने सांगितलं. त्यानंतर शाहरुख खान व आर्यन यांनी धर्मेंद्र यांची रुग्णालयात भेट घेतली. त्यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

शाहरुख खानचा व्हिडीओ

अमीषा पटेलचा व्हिडीओ व्हायरल

Ameesha Patel Emotional after Seeing Dharmendra : ‘गदर’मधील सनी देओलची को-स्टार अभिनेत्री अमीषा पटेल हीदेखील धर्मेंद्र यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयातून घरी जाताना अमीषा पटेलला अश्रू अनावर झाले. विरल भयानी या पापाराझी अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत अमीषा पटेल रडताना दिसत आहे, त्यामुळे चाहते काळजी व्यक्त करत आहेत.

Govinda met Dharmendra : गोविंदानेही ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. गोविंदा स्वतः गाडी चालवत रुग्णालयात पोहोचला होता.

दरम्यान, धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल विविध प्रकारच्या अफवा येत होत्या. त्यानंतर सनी देओलच्या टीमने आणि हेमा मालिनींनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन चाहत्यांना केलं होतं. तसेच हेमा मालिनी यांनी स्वतः पोस्ट करून धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल अपडेट शेअर केली.

“धरमजी रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. त्यांच्याबद्दल काळजी आणि प्रार्थना केल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. त्यांच्यावर डॉक्टर सतत लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही सर्वजण त्यांच्याबरोबर आहोत. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की त्यांच्या आरोग्यासाठी आणि ते लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करा,” असं हेमा मालिनी यांनी सांगितलं.