Pathaan review : तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार यासाठी ‘पठाण’च्या संपूर्ण टीमने आणि चित्रपटसृष्टीच्या एकोसिस्टमने प्रचंड मेहनत घेतली. प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यातसुद्धा या चित्रपटाला यश मिळालं आहे, पण शाहरुख खानच्या कमबॅकसाठी हा चित्रपट निवडणं योग्य नव्हतं हे चित्रपट पाहून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येतं. ‘यश राज’ या बॅनरखाली बनलेला ‘पठाण’ हा एक तद्दन कमर्शियल मसालापट आहे हे त्याच्या सादरीकरणावरूनच समजलं होतं, पण ४ वर्षं ब्रेक घेणाऱ्या शाहरुख खानच्या पुनरागमनासाठी हा चित्रपट योग्य नव्हता हे मात्र नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाहरुख खान हा काही अ‍ॅक्शन हीरो नाही, तो ओळखला जातो त्याच्या रोमान्ससाठी आणि संयत अभिनयासाठी. लहान मुलगा एखादी गोष्ट हवी असल्यास कसा हट्ट धरून बसतो, तसंच शाहरुखचा अ‍ॅक्शनपट करण्याचा अट्टहास त्यालाच नडलाय असं ‘पठाण’ बघताना जाणवतं. अर्थात शाहरुखचा चार्म, स्वॅग, त्याची लाजवाब संवादफेक हे सगळं यात आहे आणि ते आपल्याला प्रचंड आवडतं, पण हा चित्रपट म्हणजे ओढून ताणून बनवलेला अ‍ॅक्शनपट आहे असं सतत वाटत राहतं.

आणखी वाचा : ‘पठाण’ प्रदर्शित झाल्यावर काय असेल शाहरुख खानचा पुढचा प्लॅन? किंग खान म्हणतो, “उद्या मी…”

चित्रपटाचं कथानक तसं खूप साधं आहे. भारतातील एक सिक्युरिटी एजन्सी आणि त्यांच्या काही एजंट्समधला बेबनाव, देशाच्या बरबादीची स्वप्नं पाहणारा एक दहशतवादी गट आणि त्यांचे मनसुबे हाणून पाडणाऱ्या एजंटमधील चकमक आणि अपेक्षित शेवट. याला जैविकयुद्ध आणि विज्ञानाची जोड देऊन आजवर बऱ्याच चित्रपटात सादर केलेलं कथानक नव्या वेष्टनासह आपल्यासमोर ‘पठाण’च्या माध्यमातून सादर करण्यात आलं आहे. या संपूर्ण कथानकात यश राजच्या ‘स्पाय युनिवर्स’मध्ये कितीही नाही म्हंटलं तरी धर्म आणि भारत-पाकिस्तान हा मुद्दा जाणूनबुजून अधोरेखित करण्याचा अट्टहास आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडचा आहे. ‘एक था टायगर’ असो किंवा ‘वॉर’ पाकिस्तानच्या गुप्तहेरांना एका हीरोप्रमाणे का सादर केलं जातं हे अजूनही मला समजलेलं नाही. ‘पठाण’मध्येसुद्धा हीच गोष्ट अधोरेखित केली जाते आणि वरवर सेक्युलर वाटणारा ‘पठाण’ हा कम्युनल वाटायला लागतो, अर्थात हे न समजण्याइतका प्रेक्षक नक्कीच दूधखुळा नाही.

‘पठाण’ हा पूर्णपणे शाहरुख खान शो आहे, जॉन अब्राहमचं जीम हे पात्र अत्यंत कपटी आणि उलट्या काळजाचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्याचा म्हणावा तसा प्रभाव आपल्यावर पडत नाही. दीपिका पदूकोणचं रुबिना हे पात्र आयएसआय एजंट असून ती कधी ‘जीम’च्या बाजूने तर कधी ‘पठाण’च्या बाजूने असं हे पात्र तळ्यात मळ्यात खेळत असतं. शिवाय यातही ‘रॉ’ आणि ‘आयएसआय’च्या एजंटटमधली दाखवलेली प्रेमकहाणी अत्यंत हास्यास्पद आहे किंबहुना ती अपमानकारकही वाटते. शेवटी या सगळ्याकडे आपण काल्पनिक कथा म्हणून कानाडोळा करतो, पण कथा, पटकथेच्या बाबतीत ‘पठाण’ अत्यंत कमकुवत आहे हे प्रकर्षाने जाणवतं.

तांत्रिक बाजूंच्या बाबतीत मात्र ‘पठाण’ नक्कीच उजवा ठरतो, शिवाय दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी चित्रपटाचा वेगही कायम ठेवला आहे. कथा जरी कमकुवत असली तरी सिद्धार्थ आनंदने त्या कथेचं सादरीकरण उत्तमरित्या केल्याने चित्रपट कुठेही रटाळ वाटत नाही. काही फाईट सीन्स खूप उत्तमरीत्या सादर केले आहेत, तर काही सीन्स हे प्रचंड हास्यास्पद झाले आहेत. खासकरून सलमानच्या ‘टायगर’चा कॅमिओ आणि त्यादरम्यानचा फाईट सीन हा प्रचंड वाईट आहे, या सीनदरम्यान शाहरुख आणि सलमान या दोन सेलिब्रिटीजची लोकप्रियता एनकॅश करण्याचा नादात चित्रपटाचा सुर हरवलेला जाणवतो. खासकरून क्लायमॅक्सचा सीन आणि गोठलेल्या तलावावरचा बाईक चेसिंग सीन या दोन्ही सीन्समध्ये कनव्हीक्शन अजिबात दिसत नसल्याने ते सीन्स फिके पडतात.

जॉन अब्राहमने त्याच्या परीने उत्तम काम करायचा प्रयत्न केला आहे आणि त्याचंच काम तेवढं वाखाणण्याजोगं आहे. बाकी सहाय्यक भूमिकेत आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांचं काम यथातथाच आहे. दीपिका पदूकोणचं पात्र बॉन्डपटातील बॉन्डगर्लप्रमाणे सादर करायचा केविलवाणा प्रयत्न हा या चित्रपटाचा आणखी एक कमकुवत भाग आणि तिला गरज नसताना बोल्ड दाखवण्याचा अट्टहासच या चित्रपटाला मारक ठरणार आहे. हा चित्रपट फक्त आणि फक्त शाहरुख खान शो जरी असला तरी तो करत असलेले अ‍ॅक्शन सीन्स आपल्याला पटत नाही, बाकी त्याचा लूक, संवादफेक आणि बेदरकार ऍटीट्यूड या गोष्टी त्याच्या चाहत्यांना नक्कीच चित्रपटगृहाकडे खेचून आणतील, पण या चित्रपटातून ४ वर्षांनी काहीतरी वेगळा शाहरुख आपल्याला पाहायला मिळेल ही अपेक्षा न ठेवलेलीच बरी.

बाकी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वापरलेली स्ट्रॅटजी नक्कीच काम करेल, एकही वादग्रस्त मुलाखत किंवा वक्तव्य नसल्याने प्रेक्षक या चित्रपटासाठी तिकीटबारीवर गर्दी नक्कीच करतील, हा चित्रपट बरेच रेकॉर्डही मोडीत काढेल, पण ४ वर्षं ब्रेक घेणाऱ्या शाहरुखला या रूपात पाहून कित्येकांचा भ्रमनिरासही होईल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan deepika padukone starrrer most awaited pathaan movie review in marathi avn
First published on: 25-01-2023 at 12:57 IST