बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने ‘पठाण’मधून धमाकेदार कमबॅक केला. तेव्हापासून शाहरुख खान चर्चेत आहे. दिवसागणिक शाहरुखचं फॅन फॉलोइंग प्रचंड वाढत आहे. अभिनय, रोमान्स, चार्म याबरोबरच शाहरुख हा त्याच्या हजरजबाबीपणासाठी प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचा हाच मिस्कील स्वभाव लोकांना फार आवडतो.

नुकतंच शाहरुख खानने पत्नी गौरी खानच्या कॉफी टेबल बुक ‘माय लाइफ इन अ डिझाइन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात हजेरी लावली. या वेळी शाहरुख आणि गौरी दोघांनी पत्रकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. शाहरुखनेही सगळ्या प्रश्नांना मनापासून उत्तरं दिली, यातच एका व्यक्तीने गौरी ही शाहरुखपेक्षा जास्त हुशार असल्याचं वक्तव्य केलं आणि यानंतर यावरील शाहरुखच्या टिप्पणीने सगळ्यांची मनं जिंकली.

आणखी वाचा : ‘द केरला स्टोरी’चा बॉक्स ऑफिसवर डंका; लवकरच गाठणार १५० कोटींचा टप्पा, कमावले ‘इतके’ कोटी

या कार्यक्रमात त्या व्यक्तीने म्हटलं की “किमान हुशारीच्या बाबतीत तर गौरी शाहरुखपेक्षा वरचढ आहे.” यावर उत्तर देताना शाहरुख पहिला हसला अन् म्हणाला, “मी तुझ्यापेक्षा खूप चांगला दिसतो.” जेव्हा समोरच्या व्यक्तीने हुशारीवर पुन्हा जोर दिला तेव्हा शाहरुख मस्करीमध्ये म्हणाला, “जर तुमच्याकडे माझ्यासारखे गुड लूक्स असतील तर हुशारीची काय गरज?”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख खानच्या या उत्तरावर हॉलमध्ये एकच हंशा पिकला. या मुलाखतीदरम्यान शाहरुखने गौरी खानच्या कामाबद्दल भाष्य केलं. त्याचं घर ‘मन्नत’ हे डिझाइन करण्यात सर्वात मोठा वाटा हा गौरीचाच असल्याचं किंग खानने स्पष्ट केलं. ‘पठाण’ पाठोपाठ शाहरुख खानच्या ‘डंकी’ आणि ‘जवान’ या चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. यापैकी ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.