जानकी बोडीवाला या २९ वर्षीय अभिनेत्रीने अजय देवगण व आर. माधवन या दिग्गज कलाकारांबरोबर ‘शैतान’मध्ये काम करून बॉलीवूड पदार्पण केलं. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. जानकीने ‘वश’ या गुजराती चित्रपटात काम केलं होतं, ‘शैतान’ हा त्याचाच रिमेक आहे. जानकीने या चित्रपटाबद्दल एक खास गोष्ट सांगितली आहे.

जानकी म्हणाली की या चित्रपटातील एका दृश्यासाठी दिग्दर्शकाने तिला खरोखर लघवी करावी लागेल असं सांगितलं होतं. या सीनसाठी तिने आनंदाने होकार दिला होता.

फिल्मफेअरशी बोलताना जानकी बोडीवाला म्हणाली, “मी गुजराती व्हर्जन केलं, तिथेही मला तेच सीन करायचे होते. दिग्दर्शक कृष्णदेव याज्ञिक खूप छान व्यक्ती आहेत. आम्ही सिनेमासाठी कार्यशाळा करत होतो, तेव्हा त्यांनी मला विचारलं, तू लघवीचा सीन खरंच करू शकतेस का? तू केला तर याचा खूप मोठा परिणाम होईल. मी ते ऐकल्यावर खूश होते. कारण एक अभिनेत्री म्हणून मला पडद्यावर ते करण्याची संधी मिळत आहे. असं काहीतरी जे आधी कोणीही कधीच केलं नाही.”

या सीनमुळे जानकीने चित्रपटासाठी दिला होकार

जानकी म्हणाली, “मी खूश होते, कारण मला या सिनेमात त्या गोष्टी करायला मिळाल्या, ज्या मी खऱ्या आयुष्यात करू शकत नाही. लघवीचा सीन हा माझा सर्वात आवडता सीन आहे आणि त्याच सीनमुळे मी चित्रपटासाठी होकार दिला होता.”

लघवी करण्याचा सीन शूट करणं दिग्दर्शकाला अशक्य वाटत होतं, पण या सीनमुळे जानकी चित्रपटासाठी उत्साही होती. “हा सीन नंतर होऊ शकला नाही, कारण त्यासाठी खूप रिटेक घ्यावे लागले असते. सेटवर प्रॅक्टिकली तो सीन शूट करणं अशक्य होतं,” असं जानकी म्हणाली.

‘वश’ सिनेमात हितू कनोडिया, नीलम पांचाल व हितेन कुमार होते. यात जानकीने मुलीची भूमिका केली होती. तर, ‘शैतान’मध्ये अजय देवगण, आर माधवन व ज्योतिका यांनी काम केलं होतं, यात जानकीने ‘वश’मधील भूमिका केली होती.

जानकी बोडीवाला कोण आहे?

जानकी बोडीवाला लोकप्रिय गुजराती अभिनेत्री आहे. गुजराती चित्रपट ‘छेल्लो दिवस’मधून तिने करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने ‘ओ! तारे’, ‘तंबूरो’, ‘छुट्टी जाशे छक्का’, ‘तारी माटे वन्स मोर’ व ‘नाडी दोष’ सिनेमे केले. ‘वश’ चित्रपट सुपरहिट ठरल्यावर जानकीला हिंदीतील ‘शैतान’साठी घेण्यात आलं.