२००९ साली ‘३ इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातली गाणी संवाद चित्रपटाची कथा हे सर्वच सुपरहिट ठरलं. प्रेक्षक आता ‘३ इडियट्स’ च्या दुसरा भागाची आतुरतेने वाट पाहत आहे. आता चित्रपटात राजूची भूमिका साकारणाऱ्या शर्मन जोशीने या चित्रपटाच्या सीक्वलबाबत मोठी हिंट दिली आहे.
डीएनएशी बोलताना शर्मन जोशीने ‘३ इडियट्स’च्या दुसऱ्या भागाबद्दल भाष्य केलं आहे. शर्मन म्हणाला ”या चित्रपटाचा सिक्वेल बनवण्यासाठी राजू सर खूप उत्सुक आहे. सध्या ते चित्रपटाच्या कथेवर काम करत आहे. तुम्ही काळजी करू नका, जेव्हा चित्रपटाची कथा पूर्ण होईल तेव्हा आम्ही त्या कथेवर काम करू.”
मध्यंतरी शर्मन जोशीने त्याचा आमिर खान आणि आर माधवनबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या व्हिडिओमधून ‘३ इडियट्स’चा सीक्वल येणार असल्याचे संकेत मिळाले होते. पण हे तिघे शर्मनच्या आगामी ‘काँग्रॅज्युलेशन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते.
‘३ इडियट्स’ २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शर्मन जोशी व्यतिरिक्त आमिर खान, आर माधवन, करीना कपूर, बोमन इराणी, ओमी वैद्य आणि मोना सिंग यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जोरदार कमाई केली होती