अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर दोन आरोपींनी रविवारी (१४ एप्रिलला) पहाटे गोळ्या झाडल्या. या गोळीबार करणाऱ्या दोन्ही हल्लेखोरांना मुंबई क्राइम ब्रांचने गुजरातमधील भुज येथून अटक केली आहे. या दोघांनाही २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेबाबत ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तृणमूल काँग्रेसचे लोकसभा उमेदवार आणि ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी या घटनेचा निषेध केला आहे. “सलमान आणि त्याचे कुटुंब, त्याचे वडील व महान लेखक सलीम साहब, माझ्या खूप जवळचे आहेत. रविवारी सकाळी मला या घटनेबद्दल कळाल्यावर त्यांचं कुटुंब सुरक्षित आहे की नाही याची काळजी मला वाटत होती. सलीम साहब आणि सलमान हे आपल्या चित्रपटसृष्टीची शान आहेत. या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे,” असं सिन्हा ‘टाईम्स नाऊ’शी बोलताना म्हणाले.
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
सलमान खान व त्याचे कुटुंबीय चाहत्यांच्या प्रार्थना आणि आशीर्वादामुळे सुरक्षित असतील, असं सिन्हा म्हणाले. सेलिब्रिटींची सुरक्षा ही राज्य सरकारची प्राथमिकता असायला हवी असंही त्यांनी नमूद केलं. “अशा प्रकारे उघडपणे दहशत पसरवणं चांगलं नाही,” असं सिन्हा म्हणाले.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा व खान कुटुंबाचं खूप जवळचं नातं आहे. त्यांची मुलगी सोनाक्षी सिन्हाने सलमानच्या दबंग (२०१०) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं.