अभिनेत्री शीबा चड्ढाने सलमान खान व ऐश्वर्या रायबरोबर ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटात काम केलं होतं. सेटवरून सलमान एकदा रागात निघून गेला होता, अशी आठवण तिने सांगितलं. तसेच त्याने एका सीनमध्ये ऐश्वर्या रायसमोर शीबाला मिठी मारण्यास नकार दिला होता. सलमान व ऐश्वर्या ते डेटिंग करत होते असं म्हटलं जातं.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना शीबा म्हणाली, “ऐश्वर्या, सलमान आणि मी असा आमच्या तिघांचा एक सीन होता. या सीनमध्ये सलमानने मला मिठी मारायची होती. पण त्याने नकार दिला. मला अजूनही आठवतंय. हा क्लायमॅक्समधील सीन होता. मी पळून जाणार, असा सीन होता. त्यावेळी ऐश्वर्या राय व सलमान मला मिठी मारणार होते. पण सलमान म्हणाला, ‘मी मिठी मारणार नाही.’ त्यानंतर शूटिंग काही वेळेसाठी थांबवण्यात आलं आणि संजय लीला भन्साळीला सलमानशी बोलावं लागलं.”
नकार देण्याच्या कारणात मला रस नव्हता – शीबा
सलमान असं का वागला, हे समजलंच नाही, असं शीबा सांगते. “मी त्याला का विचारू की तो नकार का देतोय? मी नवीन होते; मला वाटलं की मी बोलू नये आणि दिग्दर्शकानेच ती परिस्थिती हाताळावी. मला खात्री आहे की नकार देण्याची त्याची काही कारणं असतील, पण ती कारणं काय होती यात मला रस नाही. मी माझ्या सह-अभिनेत्याला मला मिठी मारण्यास सांगत नव्हते, तर दिग्दर्शक दोन पात्रांना एकमेकांना मिठी मारण्यास सांगत होता. जर त्याला काही अडचण होती तर ती बोलून सोडवायला हवी होती. त्यावेळी मला असं वाटत होतं की किमान शूटिंग तरी पूर्ण करा,” असं शीबा म्हणाली.
सलमान अचानक रागात निघून गेला होता
शूटिंग दरम्यान सलमान अचानक सेटवरून निघून गेला होता, तेव्हा काय घडलं होतं याबद्दल शीबा म्हणाली, “नक्कीच काहीतरी घडलं होतं, ज्यामुळे सलमान चिडला. मला आठवतंय सलमान अचानक रागात सेटवरून निघून गेला. तो अचानक रागात बाहेर पडला… त्याने दार बंद केलं आणि एका म्हाताऱ्या लाईटमनला कदाचित सलमानमुळे लागलं होतं. पण हो सलमान रागात निघून गेला होता आणि ते पाहून ‘बाप रे, स्टार्स असेच वागतात का?’ असा विचार मी करत होते.”
दरम्यान, ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटाच्या सेटवरच सलमान व ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढली होती. नंतर ते रिलेशनशिपमध्ये होते, पण दोघांचे ब्रेकअप झाले.