Shefali Jariwala Funeral: ‘कांटा लगा गर्ल’ अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. शेफालीच्या निधनाने तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी (२७ जूनला) रात्री तिला हृदयविकाराचा झटका आला. पती पराग त्यागी तिला अंधेरी येथे रुग्णालयात घेऊन गेला, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. कूपर रुग्णालयात शेफालीचे शवविच्छेदन करण्यात आले, त्यानंतर कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत शेफालीला अखेरचा निरोप देताना तिचे आई-वडील, बहीण व पती पराग तसेच तिचा मानलेला भाऊ हिंदुस्तानी भाऊ यांना अश्रू अनावर झाले. अभिनेत्री शहनाज गिल, आरती सिंग, हिमांशी खुरानासह अनेक कलाकारांनी तिच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन तिला श्रद्धांजली वाहिली.
शेफालीला पती परागने साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला. वरिंदर चावलाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शेफालीवर अंत्यसंस्कार करताना परागला अश्रू अनावर झाल्याचं दिसतंय. जिवापाड प्रेम असलेल्या पत्नीला निरोप देताना परागला रडू कोसळलं.
पाहा व्हिडीओ –
शेफालीच्या निधनाने तिची आई सुनीता जरीवाला खचल्या आहेत. एका व्हिडीओत त्या रडून प्रचंड आक्रोश करताना दिसत आहे. काही जण त्यांना सांभाळताना दिसतात. चालताना त्यांना भोवळ आल्याचं व्हिडीओत दिसतंय. लेकीला अखेरचा निरोप देताना सुनीता यांना अश्रू अनावर झाले.
शेफाली जरीवालावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या अंत्यसंस्काराला कुटुंबीय आणि इंडस्ट्रीतील तिचे मित्र-मैत्रिणी तिला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचले. पराग व शेफालीच्या कुटुंबाचे व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. व्हिडीओवर कमेंट्स करून ते शेफालीला श्रद्धांजली वाहत आहेत.