Shilpa Shetty talk’s About Sister’s Marriage : शिल्पा शेट्टी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. शिल्पाला एक बहीण असून तीसुद्धा अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. शिल्पा शेट्टी व शमिता शेट्टी दोघी बॉलीवूडमधील लोकप्रिय बहिणींपैकी आहेत. अशातच दोघींनी नुकतीच एकत्र मुलाखत दिली आहे.
शिल्पा व शमिता यांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन ३’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यासह हुमा कुरेशी व तिचा भाऊसुद्धा उपस्थित होते. यावेळी शिल्पाने ती तिच्या बहिणीसाठी मुलं शोधत असल्याचं सांगितलं. यामध्ये कपिलने शिल्पाला विचारलं की, तिने कधी शमितासाठी स्थळं पाहिली आहेत का किंवा तिच्यासाठी कधी मुलं शोधते का?
शिल्पा शेट्टी शोधतेय धाकट्या बहिणीसाठी स्थळ
यावर शिल्पा म्हणाली, “हो, मी सरळ मुलांना विचारते त्यांचं लग्न झालं आहे की नाही. काही वेळा त्यांना वाटत असेल की मी त्यांना असं का विचारते, कारण माझं तर लग्न झालं आहे. तेव्हा मी त्यांना सांगते की, मी माझ्यासाठी विचारत नाहीये, मी माझ्या धाकट्या बहिणीसाठी विचारत आहे.”
कपिल मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला, हुमा कुरेशी एका डेटिंग अॅपमध्ये पार्टनर म्हणून काम करत आहे. त्यावर शिल्पाने बहिणीला डेटिंग अॅपचा सल्ला दिला. अभिनेत्री म्हणाली, “शमिता तिकडे जा मग तू.” कपिल पुढे म्हणाला, “हुमा, तुझा स्वत:चा डेटिंग अॅप असूनही तुझा भाऊ मात्र सिंगल आहे. ही डेटिंग अॅप चालवते पण भावासाठी एक मुलगी शोधली नाही.” यावर हुमा म्हणाली, “तो स्वत: त्याच्यासाठी मुलगी शोधू शकतो.”
मुलाखतीमध्ये पुढे हुमा कुरेशीचा भाऊ सकीब म्हणाला, “जेव्हा मी कधी कुठल्या मुलीबरोबर संपर्क करत असतो आणि गोष्टी पूर्ण होणार असतात, तेव्हा ती काहीतरी करतेच.”
दरम्यान, शिल्पा व शमिता शेट्टी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर शमिता शिल्पाची धाकटी बहीण असून दोघी अनेकदा एकमेकींबरोबर बोलत असतात. सोशल मीडियावरही दोघी अनेकदा एकमेकींबरोबरचे फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतात. शिमिता अनेकदा तिचा भाचा व भाची म्हणजेच शिल्पाच्या मुलांबरोबर असल्याचं तिच्या सोशल मीडियावरील फोटो व व्हिडीओंमधून दिसतं.