Shilpa Shirodkar on her husband: अभिनेत्री शिल्पा शिरोडकर ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉस १८ मध्येदेखील ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. या शो मध्ये सहभागी होण्यापूर्वी अभिनेत्रीने तिला पुन्हा अभिनय क्षेत्रात काम करायचे आहे, असे वक्तव्य केले होते. आता अभिनेत्री तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.

शिल्पा शिरोडकरने नुकतीच ‘झूम’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत शिल्पा म्हणाली की, बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या घराच्या स्वयंपाकघरात फार वेळ घालवला नाही. याबाबत शिल्पा म्हणाली, “माझा नवरा खूप प्रवास करतो. तो फार कमी वेळा घरात वेळ घालवतो. तर काही दिवसांपूर्वीच तो घरात होता आणि मटण बनवत होता. त्यावेळी मी प्रवास करत होते.

त्याने फोन केला आणि तो म्हणाला की, घरात काहीच नाही. मी त्याला विचारलं की, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे? त्यावर तो म्हणाला की, घरात गरम मसाला नाही. तर मी त्याला म्हणाले की, मी आता तो वापरत नाही. त्यामुळे घरात नाही. त्यावर मला म्हणाला की, तू वेडी झाली आहेस. मी त्याला म्हणाले की जेवण तर छान बनते. तुला इतके साहित्य कशाला हवे आहे.

कठीण काळात पतीची खंबीर साथ

पुढे शिल्पा असेही म्हणाली की, २५ वर्षांच्या वैवाहिक जीवनात आम्ही अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. पण, एकमेकांबद्दलचा आदर टिकून राहिला आहे. कारण मी वैयक्तिकरीत्या असे मानते की सुरुवातीला कोणत्याही नात्यात प्रेम असते; पण तो आदर कायमचा टिकतो

कठीण काळात पतीने खंबीरपणे कशी साथ दिली हेदेखील शिल्पाने सांगितले. शिल्पा म्हणाली, “तो व्यवसायाने बँकर आहे. मला त्याच्या कामाबद्दल खूप आदर आहे आणि त्याला माझ्या कामाबद्दल आदर आहे. २००९ मध्ये आम्ही भारतात आलो. तेव्हा तो त्याच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होता. पण, माझ्या पालकांच्या निधनामुळे मी भावनिक आघातातून जात होते. मी माझ्या बहिणीजवळ भारतात असणे महत्त्वाचे आहे, हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने त्याच्या कामाबद्दल मला आश्वस्त केले आणि भारतात येण्याचा निर्णय घेतला.

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत शिल्पाने सांगितलेले, “मी खूप रडत असे. अश्रूंवर माझे नियंत्रण नव्हते. काही चांगले घडले तरी मी रडणे थांबवू शकत नव्हते. मी एक रोबोटसारखी झाले होते. मला कशातही रस नव्हता. माझे वजन खूप वाढले होते, डोळ्यांखाली काळी वर्तुळे झाली होती. मी बाहेर जात नसे, काहीही करत नसे. मुलगी लहान असल्याने तिला फक्त मी शाळेत सोडत असे आणि तिला घरी घेऊन जात असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“घरी कोणाशीही बोलत नसे. मी एका समुपदेशकालाही उपचारांसाठी भेटत होते. मी ज्या व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलत असे, ती माझी बहीण होती. कारण- मला वाटायचे की, ती एकमेव आहे, जी मला समजू शकते. मी अपरेशवर खूप रागवायचे आणि आमच्या मुलीवरदेखील मी माझा राग काढायचे. कारण- मला काय करावे हे माहीत नव्हते.”