Sholay Hindi Cinema : बॉलीवूडमधील काही गाजलेल्या सिनेमांच्या यादीत येणारं मुख्य नाव म्हणजे ‘शोले’. १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘शोले’ चित्रपटानं भारतीय सिनेइंडस्ट्रीत इतिहास रचला. आजही हा सिनेमा बॉलीवूडच्या काही कल्ट सिनेमांच्या यादीत येतो. यावर्षी ‘शोले’ला ५० वर्षे झाली असून या ५० वर्षात हा सिनेमा कोणत्या ना कोणत्या कारणाने कायमच चर्चेत राहिला आहे.

अशातच ‘शोले’ला ५० वर्षे झाल्यानिमित्त इकॉनॉमिक टाइम्सचे पत्रकार राजेश एन. नायडू यांनी रोहन सिप्पी यांच्याशी संवाद साधला. रोहन सिप्पी हे स्वतः एक यशस्वी दिग्दर्शक आहेत. तसंच ‘शोले’चे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांचे ते सुपुत्रही आहेत. या संवादात रोहन यांनी त्याकाळात ‘शोले’ हा एक मोठा आणि यशस्वी स्टार्टअप होता असं म्हटलं.

याबद्दल रोहन असं म्हणाले, “माझ्या वडिलांनी तेव्हा योग्य सहकारी निवडले. अनेक अडचणींवर मात केली. त्यांच्या आत्मविश्वासाने आणि धाडसाने हा चित्रपट एक यशस्वी प्रयोग ठरला. पण ‘शोले’ला मिळालेल्या यशासारखं यश आता पुन्हा निर्माण होईल? हे कोणीच सांगू शकत नाही.”

यानंतर त्यांनी ‘शोले’सारख्या सिनेमाला केवळ एकच पुरस्कार मिळाला, यावरही आपलं मत व्यक्त केलं. याबद्दल ते म्हणाले, “हा एक मोठा प्रश्न आहे की, ‘शोले’ला पुरस्कार का मिळाले नाहीत. पण मला वाटतं, या पुरस्कारांची निवड काही निवडक मंडळी करत असतात. एवढ्या मोठ्या चित्रपटाला फिल्मफेअर हा फक्त एकच पुरस्कार मिळाला, हे आश्चर्यकारक आहे. पण तरी ‘शोले’ ५० वर्षांनंतरही चर्चेत आहे. याचाच अर्थ तो वेळेपेक्षा पुढे होता आणि आजही आहे.”

यानंतर रोहन यांनी ‘शोले’मधील त्यांच्या आवडत्या भूमिकेविषयी सांगितलं. याबद्दल ते म्हणाले, “खरंतर ‘शोले’मध्ये इतके सारे कलाकार आहेत. त्यापैकी कोणी एकाची आवडता म्हणू निवड करणं कठीण आहे. पण मला सर्वात जास्त भावले ते, अमिताभ बच्चन. त्यांची भूमिका ही शांत स्वभावाची होती. ‘शोले’मधील त्यांची भूमिका मला प्रेरणादायक वाटते.”

'शोले' सिनेमा पोस्टर (फोटो सौजन्य : लोकसत्ता)
‘शोले’ सिनेमा पोस्टर (फोटो सौजन्य : लोकसत्ता)

यानंतर रोहन यांनी त्यांच्या ‘शोले’च्या अनुभवाबद्दल सांगितलं की, “मी ‘शोले’ पहिल्यांदा चार वर्षांचा असताना पाहिला आणि तो अनुभव माझ्यासाठी अवर्णनीय आहे. त्यानंतर मी परदेशात होतो, तेव्हा काही मित्रांनाही दाखवला, तेही त्याचं कौतुक करू लागले. आजही तो गाजतोय, त्यामुळे ‘शोले’ हे एक रहस्यच आहे.”