Sikandar Box Office Collection Day 11: सलमान खान व रश्मिका मंदाना अभिनीत ‘सिकंदर’ चित्रपट ईदच्या मुहूर्तावर ३० मार्चला प्रदर्शित झाला होता. ए.आर. मुरुगादॉस दिग्दर्शित या चित्रपटात सलमान, रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर, सत्यराज महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. पहिल्या दिवशी या चित्रपटाने २६ कोटींची कमाई केली होती. पण, त्यानंतरपासून बॉक्स ऑफिसवर ‘सिकंदर’ची वाईट परिस्थिती पाहायला मिळाली. ११व्या दिवशी सलमानच्या या चित्रपटाने किती गल्ला जमवला? जाणून घ्या…

सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी बॉक्स ऑफिसवरील कमाईबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. ‘सिकंदर’ यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरेल असं म्हटलं जात होतं. तसंच अवघ्या काही दिवसांत सलमानचा हा बहुचर्चित चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करेल असा देखील अंदाज होता. पण, प्रेक्षकांनी ‘सिकंदर’ चित्रपटाकडे पाठ फिरवली. आतापर्यंत सलमानच्या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा कसा-बसा पार केला आहे. मात्र, ‘सिकंदर’ची अशीच परिस्थिती कायम राहिली तर लवकरच बॉक्स ऑफिसवरून हा चित्रपट गायब होणार असल्याचं म्हटलं जातं आहे.

दुसऱ्या आठवड्यापासून ‘सिकंदर’ चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. १०व्या दिवशी चित्रपटाने १.५ कोटींची कमाई केली होती. पण, ११व्या दिवशी कमाईत पुन्हा घसरण झाली आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘सिकंदर’ने बुधवारी, ९ मार्चला फक्त १.३५ कोटींचा गल्ला जमवला आहे.

‘सिकंदर’ चित्रपटाची आतापर्यंतची कमाई…

पहिल्या दिवशी – २६ कोटी
दुसऱ्या दिवशी – २९ कोटी
तिसऱ्या दिवशी – १९.५ कोटी
चौथ्या दिवशी – ९.७५ कोटी
पाचव्या दिवशी – ६ कोटी
पहिल्या आठवड्यात – ९०.२५ कोटी
सहाव्या दिवशी – ३.५ कोटी
सातव्या दिवशी – ४ कोटी
आठव्या दिवशी – ४.८४ कोटी
नवव्या दिवशी – १.७५ कोटी
दहाव्या दिवशी – १.५ कोटी
अकराव्या दिवशी – १.३५ कोटी
एकूण कमाई – १०७.१० कोटी

दरम्यान, गेल्यावर्षी सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता. ‘सिंघम अगेन’ आणि ‘बेबी जॉन’ या चित्रपटांमध्ये फक्त त्याचा कॅमिओ पाहायला मिळाला होता, त्यामुळे ‘सिकंदर’ चित्रपटाचं प्रदर्शन भाईजानच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नव्हतं, म्हणूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंगला लोकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. ‘सिकंदर’ चित्रपटाने अवघ्या काही तासांतच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोटींचा टप्पा ओलांडला होता. म्हणूनच बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त कमाई करेल, अशी शक्यता होती. पण, तसं काही झालं नाही.